आपके पीसी में कौन रहता है ?

142

आपके पीसी में कौन रहता है ? क्विक हिल या व्हायरस ? हि जाहिरात रेडियोवर ऐकली नसेल असा माणूस सापडणे अशक्यच. 

परंतु अनेकांना हे माहीत नसते की, क्विक हिल टेक्नॉलॉजीझ लिमिटेड या कंपनीचा निर्माणकर्ता हा मराठी माणूस आहे. कैलाश आणि संजय या काटकर बंधूंनी साकारलेल्या या मराठमोळ्या कंपनी सोबत काम करायची संधी मला २०१४ साली चालून आली आणि तेव्हाच या भावांबद्दल मनात उत्सुकता निर्माण झाली.      

सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात या भावांचा जन्म झाला. पैसे कमाविण्याच्या दृष्टीने काटकर कुटुंबियांनी पुणे हे शहर गाठले. 

दरम्यान, कैलाश काटकर यांचे वडिल फिलिप्स या कंपनीत मशीन सेटर म्हणून कार्यरत होते म्हणूनच दोन्ही भावांना लहानपणापासूनच मशीन्सचे वेड होते. मशीन काय असते, ती कशी तयार होते, मशीन बंद पडल्यावर ती रिपेअर कशी करायची याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. कैलाशचे शिक्षण दहावीत बंद पडले, त्याने भावाचे शिक्षण बंद होऊ नये म्हणून कॅल्क्युलेटर दुरुस्तीचा व्यवसाय चालू केला    

एकदा असेच ते बॅंकेतील कॅलक्युलेटर्स दुरुस्त करायला गेले असताना त्यांना टीव्हीसमान दिसणारे यंत्र पहायला मिळाले, त्या यंत्रावर काही लोक काम करीत होती. तेव्हा कैलाशला समजले कि हे यंत्र दहा माणसाची कामे एकट्याने करू शकते, कैलास ने मनाची खूणगाठ बांधली कि हेच आपले भविष्य असणार आहे. थोडे दिवसांनी कैलाशने संगणक दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. या व्यवसायात  बसल्यावर बाकीच्या दुरुस्ती करणाऱ्या लोकांशी ओळखी होऊ लागल्या आणि अनेक व्यावसायिक मित्र त्यातून बनत गेले.

दरम्यान संजय कम्प्युटर इंजिनियर बनला, जोपासना कंपनीत त्याने काम करायचा अनुभव  गाठीशी जोडला आणि नंतर एक दिवस कैलाशशी बोलत असताना त्याला कळले कि व्हायरसमुळे संगणक फार बिघडतात म्हणून मग त्याने सहज एक कोड लिहला ज्यामुळे व्हायरस बेअसर होऊ लागले. हि घटनाच होती क्विक हिलची सुरुवात. त्यानंतर कैलाशच्या संगणक दुरुस्त करणाऱ्या मित्रांच्या ओळखी असल्याने हळूहळू या एका कोडचे रूपांतर मोठ्या कंपनी मध्ये होऊ लागले.

आज या कंपनीमध्ये जवळपास १५०० कर्मचारी कामाला आहेत, किरकोळ बाजारपेठेच्या ३० टक्के बाजारपेठ एकट्या क्विक हिल कडे आहे. अशाप्रकारे दोन मराठी भावांनी शून्यातून साडेतीनशे कोटीचे साम्राज्य आपल्या बुद्धी, प्रामाणिकपणा आणि कठोर मेहनतीच्या जोरावर निर्माण केलं आहे.