‘ऍपलच’ सफरचंद कोणी खाल्लं  ? 

167

कोणत्याही स्टार्टअप साठी त्यांचा लोगो हि फार महत्वाची गोष्ट असते, कर्मचारी, ग्राहक इत्यादी मंडळी या लोगो वरून कंपनीला ओळखतात. कंपनी जेव्हा रिटेल मध्ये काम करत असते तेव्हा तर या लोगोला अनन्य साधारण महत्व प्राप्त होते. फेसबुकचा f, लिंकडइनचा in किंवा ट्विटर चा पक्षी हे आपण कुठेही पहिले तरी आपण त्या कंपनीशी किंवा संकेतस्थळाशी जोडले जातो. लोगो तयार करताना त्या मागे एक विचार असतो तो त्या छोट्याशा चित्रातून उतरत असतो. असाच एक लोगो जो आपल्याला एका सुंदर उत्पादनाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो तो म्हणजे खाल्लेलं सफरचंद.   

१९७६ साली स्थापन झालेल्या ऍपल कंपनीचा पहिला लोगो मुळात सफरचंद हा नव्हताच तर न्यूटन आणि सफरचंदाचे झाड ह्यांचा मिळून बनला होता. कंपनीचा सहसंस्थापक रोनाल्ड वेन ह्याने डिजाईन केलेला कंपनीचा मूळ लोगो खूप भन्नाट होता. त्यामध्ये महान शास्त्रज्ञ न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला दाखविण्यात आला होता आणि त्याच्या डोक्याच्या बरोबर वर एक सफरचंद लटकताना दाखविलेले होते. म्हणजेच न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्या घटनेच्या स्मरणार्थ हा लोगो बनविण्यात आला होता.

ऍपलचा संस्थापक स्टिव्ह जॉब्स ह्याला तो लोगो काही रुचला नाही. जुन्या लोगोला जेमतेम एक वर्ष झाले असेल आणि त्याने तो बदलण्याचा निर्णय घेतला. नवीन लोगो बनविण्याचे काम रॉब जेनॉफ ह्या डिझायनरला देण्यात आले. त्याला फक्त एवढीच सूचना देण्यात आली की एक साधा आणि जास्त किचकट नसणारा लोगो हवा. त्याने पहिल्यांदा सफरचंदाचे फळ लोगो म्हणून वापरायची कल्पना मांडली. पण नंतर त्यांच्या असे लक्षात आले की तो लोगो छोट्या आकारात वापरला तर ते नक्की सफरचंदाचे फळ आहे की चेरीचे फळ आहे ते समजून येत नव्हते. म्हणून त्यांनी त्याचा एक भाग खाल्लेला दाखवला. अशा प्रकारे ऍपल कंपनीचा लोगो डिजाईन करण्यात आला.

सुरुवातीचा लोगो हा इंद्रधनुष्याच्या रंगामध्ये बनविण्यात आला होता आणि त्यात हिरवा रंग हा वर दाखविण्यात आला होता जेणेकरून वरच्या बाजूला झाडाचे पान आहे असे वाटेल. हा लोगो पुढे अनेक वर्षे वापरण्यात आला.

पुढे १९९८ मध्ये रंगीबेरंगी लोगो बदलून अर्धपारदर्शक लोगो बाजारात आणण्यात आला.

पुढे ह्या लोगोमध्ये तीनदा बदल करून सध्या प्रचलित असणारा लोगो बनविण्यात आला. १९७७ पासून सफरचंद तसेच ठेवण्यात आले आहे फक्त रंगांमध्ये अधूनमधून बदल करण्यात आले.

खाल्लेल्या भागाला अजून एक अन्वयार्थ काढला जातो. संगणक क्षेत्राची मुहूर्तमेढ बाईट या संकल्पनेतून रोवली गेली, ऍपल संगणक क्षेत्राच्या उदयापासून काम करत असल्याने त्यांच्या लोगोमध्ये बाईट (bite – चावलेला तुकडा) दाखविण्यात आला अशीही विचारधारा या मागे असल्याचे सांगितले जाते.  

अजून एक मतप्रवाह असा आहे की संगणक क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी बजावून कायम दुर्लक्षित राहिलेल्या ऍलन ट्युरिंग ह्याच्या स्मरणार्थ हा लोगो बनविण्यात आला. काळाच्या एक पाऊल पुढे असणारा ऍलन हा सदैव दुर्लक्षित राहिला आणि त्याच्या समलैंगिक विचारांमुळे त्याच्यावर खूप अत्याचार करण्यात आले. शेवटी अत्याचारांना कंटाळून त्याने सायनाईड हे जहाल विष मिसळण्यात आलेल्या सफरचंदाचा तुकडा खाऊन आत्महत्या केली. 

आता विचार कोणताही असला तरी तो अत्यंत प्रभावी पद्धतीने लोगो मधून पुढे आला आहे आणि म्हणून खाल्लेला सफरचंद दिसला कि आपल्याला ऍपलच्या फोन ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.