कडकनाथ कोंबडी घोटाळा काय आहे?

317

कडकनाथ ही कोंबडीची एक जात आहे. ही कोंबडी विशेष असण्याचे कारण म्हणजे हिचा रंग पूर्णतः काळा असतो. रक्त सुद्धा काळे असते…एवढेच काय तर अंडे देखील काळे असते. ह्या कोंबडीची मागणी भरपूर असल्याने अनेक शेतकरी कडकनाथ कोंबडी पालनाकडे आकर्षित होत होते आणि याचाच फायदा घेतला महारयत ऍग्रो नावाच्या कंपनीने.

कडकनाथ कुकुटपालन प्रकल्पात गुंतवणूक करुन रक्कम दुप्पट, तिप्पट करण्याच्या नावाखाली महारत अ‍ॅग्रो कंपनीने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील हजारो शेतकर्‍यांची लूट या कंपनीने केली असल्याचे आता दिसून येते आहे. कोणत्याही फसव्या गुंतवणूक योजनेचं जे होते तेच या कंपनीच्या योजनांचे झाले. पहिले काही दिवस स्वतःच्या खिशातून परतावा दिला, नंतर येणाऱ्या गुंतवणुकीतून परतावा दिला पण जेव्हा येणाऱ्या गुंतवणुकीचा ओघ आटला तेव्हा सगळंच संपले.  

गुंतवणूकदारांना परतावा देऊ शकत नसल्याने राज्यातील अनेक कार्यालयांना टाळे ठोकून कंपनीचे संचालक फरार झाले. 

‘रक्कम गुंतवा, पक्षी पाळा, अंडी व कोंबड्या विका’ असे या योजनेचे स्वरुप होते. यात प्रोजेक्ट मालकास एकूण ७५ हजार रुपयांची गुंतवणूक करायची होती. 

कोंबड्या घेताना ४० हजार आणि राहिलेले ३५ हजार ३ महिन्यांनतर द्यायची होती त्यामुळे हि योजना  कालावधीत प्रसिद्ध झाली. या कालावधीत २०० पक्षांच्या युनिटसाठी कंपनीनेच खाद्य, औषधे, लस आणि भांडी वगैरे दिलेली 

तीन महिन्यानंतर कंपनी गुंतवणूकदाराकडे १०० मादी आणि २० नर ठेवून ८० कोंबड्या घेऊन जात असे. इथेच पॉन्झी योजनेची बीज रोवली गेली. गुंतवणूकदारांच्या पैशाने आलेल्या कोंबड्या कंपन्या घेऊन जायची आणि त्याच कोंबड्या इतर गुंतवणूकदारांना विकायची. मग नवीन गुंतवणूकदारांच्या ८० कोंबड्या पुढच्या गुंतवणूकदाराला.  

४ ते ५ महिन्यानंतर पक्ष्यांनी अंडी देणे सुरू केल्यानंतर कंपनी पहिली २ हजार अंडी प्रतिनग ५० रुपयाने (एक लाख रुपये), दुसरी दोन हजार अंडी ३० रुपयाने (६० हजार रुपये)  व तिसरी ३५०० अंडी २० रुपये (७० हजार रुपये)  या दराने घेऊन जात असे. 

यातून शेतकर्‍याला एका वर्षात २.३० लाख रुपये केवळ अंड्यातून मिळणार होते. ७५०० अंडी विकून झाली कि मग १२० कोंबड्या ३७५ रुपयाने विकत घेतल्या जाणार होत्या म्हणजे ४५००० रुपये त्या पक्षांचे पण मिळणार होते. ऐकायला योजना खूपच मस्त होती. अनेक शेतकरी या योजनेला बळी पडत गेले. 

जोवर नवीन गुंतवणूक येत होती तोवर जुने गुंतवणूकदार पैसे कमवत गेले पण जिथे आडातच नव्हते तिथे पोहऱ्यात येणारच कुठून होते. 

कंपनी कडे इतक्या मोठ्या प्रमाणात परतावा देण्यासाठी कुठून तरी पैसे येणे आवश्यक होते, कंपनीची योजना होती ती अंडी विकायची. या प्रकल्पात उत्पादित झालेली अंडी व पक्षी पंचतारांकित हॉटेलात मोठ्या भावाने जात असल्याची हाकाटी कंपनीने पिटली होती.

विक्रीच होत नसल्याने लाखोंकी बाते, करोडों कि धुल, चोपडा खोल के देखा तो मुद्दल भी गुल अशी अवस्था या गुंतवणूकदारांची झालेली.   

जशी नवीन गुंतवणूक कमी होऊ लागली तशी पुढे चालणारी साखळी ठप्प झाली. परिणामी शेतकर्‍यांना दिल्या जाणारा परताव्याची उधारी वाढू लागली. हळूहळू शेतकर्‍यांची थकित रक्कम वाढत गेली. सुमारे ८ हजार शेतकर्‍यांचे सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांचे नुकसान यात झालेले असावे.