कोरोना नंतर स्टार्टअप्सचे मूल्यांकन

34

खरं तर हा काळ उत्साहाचा नाही, सर्वत्र कोरोनामुळे वातावरण थंडावले आहे. व्यवसाय थंड आहेत आणि स्टार्टअप्स पण याला अपवाद नाहीत. अनिश्चिततेच्या या काळात सगळीच गणित बदलताना दिसत आहेत. किराणा, प्रवास, हॉटेल किंवा कार्यक्रम आयोजन संबंधित व्यवसायांना दिलेली इंटरनेटची जोड असे साधारण भारतातल्या यशस्वी स्टार्टअप्सचे स्वरूप होते. पण येत्या काही दिवसात ते बदलायची शक्यता दिसायला लागली आहे. सरकारी पातळीवरून कोरोनाशी लढायची उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांना सहायता पॅकेजेस जाहीर झाली आहेत. कोरोना लोक डाऊन नंतरचा काळ हा स्टार्टअप्स साठी खडतर असण्याची चिन्ह दिसायला लागली आहेत. न्यूज इंटरप्रेटेशन या संस्थेच्या मते कोरोनाचा कठीण काळ संपल्या नंतर अनेक स्टार्टअप्सचे पुनर्मूल्यांकन होणं अपरिहार्य आहे.

फ्लिपकार्ट असेल, ओला असेल,ओयो असेल, बिगबास्केट असेल किंवा स्वीगी असेल या सगळ्या कंपन्यांचे विक्रीचे आकडे सध्या नाट्यमयरित्या खालावले आहेत हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. फ्लिपकार्ट सोडून इतरांच्या व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांचा पैसा लागतो पण तो ओघ आता मंदावला आहे. 
या कंपन्यांनी आजवर केवळ वाढीव खप दाखवून कोटीच्या कोटी मूल्यांकनाची उड्डाणे केली पण आता मात्र गुंतवणूकदारांवर या व्हॅल्युएशनचा विचार करायची वेळ आली आहे. अर्थव्यवस्था चांगली असताना देखील या कंपन्या कधी नफा कमावू शकल्या नव्हत्या, त्यांचा सगळा व्यवसाय चालायचा तो भविष्यातले विक्रीचे आकडे दाखवून. कोरोनाला किंवा कोरोना सारख्या आपत्तीला, भविष्यातल्या विक्रीचे आकडे मांडताना किती कंपन्यांनी गृहीत धरलेलं यावर आता बरच काही अवलंबून आहे. भारतात काय होईल हे सांगणं अवघड असलं तरी  काही गुंतवणूकदार कोरोनाचे वादळ संपले कि स्टार्टअप्स मधील गुंतवणूक काढून घ्यायला पाहतील. जेव्हा गुंतवणूकदार एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करतात तेव्हाच ते हे पण ठरवतात कि आपण बाहेर कधी आणि किती मूल्यांकन असताना पडायचं. 

खरं तर स्टार्टअपच मूल्यांकन हा सगळ्यात खडतर विषय असतो. स्टार्टअप्सचे मूल्यांकन करायला कोणतेच ठोकताळे नसतात, कोणती अकौंटिंग स्टँडर्ड्स नसतात, ना कोणते ठरलेले फॉर्म्युले. स्टार्टअपचे  मूल्यांकन हे माणूस पाहून केलं जातं, मूल्यांकन करताना कंपनीच्या प्रवर्तकांची समज, व्यवसायाची पद्धती, त्यांची पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टींना खूप महत्व असते, म्हणून आपण पाहतो कि आयआयएम किंवा आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी चालू केलेल्या स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांचा प्रतिसाद हा नेहमी चांगलाच असतो.या शिवाय गुंतवणूक करताना पहिला जाणारा घटक असतो तो म्हणजे संधी. म्हणजे व्यवसायाची संधी जितकी मोठी तितकी मूल्यांकन मोठं असायची शक्यता. किराणा माल अवघ्या देशात विकणे हि खूप मोठी संधी होती त्यामुळेच फ्लिपकार्ट मूल्यांकनाची उड्डाणे करत गेलं. भारतातल्या प्रत्येक शहरात टॅक्सी उपलब्ध करून देणे हि मोठी संधी होती म्हणून ओलाचे मूल्यांकन वाढत वाढत वाढतच चाललं आहे.  या नंतर गुंतवणुकीचा तिसरा महत्वाचा घटक असतो तो तंत्रज्ञान. तुम्ही तुमचे उत्पादन अथवा सेवा देताना कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरता या मध्ये देखील गुंतवणूकदारांना रस असतो. बरेचदा पायथॉन वापरले आहे का रुबी ऑन रेल, अमेझॉन क्लाउड वापरला का अझुरेचा क्लाउड या गोष्टी इंटरनेट आधारित स्टार्टअप साठी महत्वाच्या ठरतात. तर उत्पादन बनवण्यासाठी तुम्ही अद्ययावत अथवा काळाच्या पुढचे तंत्रज्ञान वापरता आहात का यात देखील गुंतवणूकदारांना रस असतो.

जर गुंतवणूकदार हि त्या क्षेत्रातील मोठी कंपनी असेल तर त्यांना आपल्या कंपनीचा या उत्पादनामुळे कसा फायदा होईल हे पाहण्यात जास्त रस असतो.