गुंतवणूक करताना टाळायच्या गोष्टी

  686

  भारतात नवश्रीमंतांची कमी नाही, अनेक कारणास्तव आज लोकांच्या हातात पैसा खुळखुळत आहे, कोणी जमीन विकून पैसे कमावले आहेत तर कोणी परदेशात जाऊन, कोणी नौकरी करून तर कोणी व्यवसाय करून. पण फास्ट फूडच्या युगात १० टक्के परतावा मिळवायला एक वर्ष थांबायची कोणाचीच तयारी नाही. आज लोकांना लगेच श्रीमंत व्हायचं आहे, आज गुंतवणूक केली कि उद्या परतावा पाहिजे आहे, त्यामुळे अनेक नवयुवक, नवश्रीमंत  मंडळी गुंतवणुकीसाठी नवीन संधीच्या शोधात आहेत पण अशा संधी शोधताना अनेकजण भूलथापांना आणि भलत्याच गुंतवणुकीच्या पद्धतींना बळी पडत आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना जगातल्या मोठ्ठ्या कंपन्यासुद्धा तज्ञ मंडळींचा सल्ला घेतात, मॅकेंझी, केपीएमजी,रिस्कप्रो आदी लोकांची दुकाने या गुंतवणूकदारांना विविध प्रकारचे सल्ले दिल्यामुळे  चालतात पण बरेचदा सामान्य गुंतवणूकदार असल्या गोष्टींचा फार विचार करताना दिसत नाहीत आणि मग यातून महाप्रचंड घोटाळे जन्माला येत आहेत मग ते समृद्ध जीवन असो कि जागृती ऍग्रो असो  सध्या तर महाराष्ट्रात गुंतवणूक कंपन्यांचं पिकच आल आहे. महाराष्ट्र इन्व्हेस्टर प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ depositors नावाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवून अनेक गुंतवणूकदारांना दिलासा दिला. जवळ जवळ ३०००० कोटी रुपयांचे नुकसान विविध  प्रकारच्या  गुंतवणुकीत झाल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे. यात कित्येक लाख लोकांचे हात पण पोळले गेले आहेत त्यामुळे या विषयावर थोडी जागरुकता निर्माण करायची आवश्यकता आहे म्हणून हे सदर लिहायचा खटाटोप. इंडियाफोरेंसिक हि संस्था या विषयावर विविध वर्तमान पात्रात लेख लिहून आणि या विषयावरचे अभ्यासक्रम चालवून सादर विषयावर जागरूकता निर्माण करत असते   
  पारंपरिक असलेल्या सोन्याचांदीत आणि भांडवल बाजारात गुंतवणूक करून परतावा मिळवण्यासाठी मोठी जोखीम घ्यावी लागते पण याही पेक्षा जर कोणी जास्त परतावा देत असेल तर एक मिनिट थांबा, तुम्ही एका मोठ्या षड्यंत्राचा तर बळी होत नाही आहात ना ? तुमची आयुष्यभराची पुंजी तुम्ही अशा न चोखाळलेल्या वाटेवर घेऊन तर उभे नाही आहात ना? कोणतीही अप्रचलित गुंतवणूककरायच्या आधी पुन्हा एकदा विचार करा. खाली देत असलेल्या काही महत्वपूर्ण बाबींवर नक्की लक्ष द्या 

  • सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असलेल्या व्यवसायाचा आणि सध्याचा बाजारातल्या परिस्थितीचा काही ताळमेळ आहे का ? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. समजा भांडवल बाजारात कोणीच गुंतवणूक करत नसेल , विदेशी भांडवलाचा रोख मंदावला असेल आणि अशा परिस्थिती जर कोणी डॉट कोम ब्रोकिंगच्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न १००% परतावा देणारे असेल, असं सांगत असेल, तर यात कुठे तरी डाळ शिजते आहे असं मानायला हरकत नाही. काही वर्षान पूर्वी होम ट्रेडच्या बाबतीत नेमके हेच घडलेल. तेव्हा जर मंदीची परिस्थिती लक्षात घेतली असती तर आज कित्येक सहकारी बँका बुडण्यापासून वाचल्या असत्या.   
  • ज्या व्यवसायात गुंतवणूक करायची आहे त्या व्यवसायाचे काही रहस्य असे आहे का कि जे खूपच क्रांतिकारी आहे आणि ज्यावर त्या व्यवसायाची वृद्धी अवलंबून आहे. म्हणजे एखादी कंपनी जर तुम्हाला म्हणत असेल कि आम्ही भारताबाहेर कोणत्या तरी जास्त परतावा देणाऱ्या व्यवसाया मध्ये पैसे गुंतवतो आणि त्यातून आम्हाला १००% परतावा मिळतो, म्हणून आम्ही तुम्हाला ७०% परतावा देतो तर सर्वात पहिले हा प्रश्न पडला पाहिजे कि असा कोणता व्यवसाय आहे बुआ कि जिथे १००% परतवा मिळतो ? जिथे जगातले बाकीचे लोक पैसे लावत नाही आहेत आणि याच कंपनीला किंवा कंपनीचा मालकांना तो कसा काय माहिती आहे ? जगात सगळ्यात मोठ्ठा ठरलेल्या बर्नी मॅडॉफ प्रकरणात नेमक हेच घडलेलं, मॅडॉफ किंवा त्याचा कंपनीने कोणत्याच गुंतवणूकदाराला त्यांच्या गुंतवणूक पद्धतीचा सुगावा कधीच लागू दिला नाही त्यामुळे लोक केवळ विश्वासावर पैसे लावत गेले आणि एक वेळ अशी आली कि जिथे सगळच होत्याचं नव्हतं झालं. 
  • जगात आम्हाला स्पर्धाच नाही असं जर कोणी म्हणत असेल तर असा व्यवसाय गुंतवणुकीसाठी शक्यतो टाळावाच कारण त्या व्यवसायाला कधी टाळे लागेल याची खात्री देता येत नाही, मोठ्यात मोठ्या गुंतवणूकदारांना पण स्पर्धेत जिंकणारेच घोडे आवडतात. पण एखादा व्यवसाय स्पर्धे पेक्षा खूपच चांगला व्यवसाय करत आहे आणि म्हणून मोठ्ठ्या परताव्याचे आश्वासन देत आहे तर गुंतवणूकदारा जरा सावधान, हे असे का होत आहे हे पहिले जाणून घ्यायचा प्रयत्न करा. Software चा व्यवसाय करत आहे आणि ३००% वाढ आहे असं जर भारतात कोणी म्हणत असेल तर गुंतवणूकदाराला थोडे आकडे तपासायाची गरज आहे ,  Software व्यवसायातल्या बाकीच्या कंपन्या का बर एवढ्या जोरात वाढत नाही आहेत आणि एखादीच कंपनी का वाढत आहे या बद्दल खातर जमा करा, कोणी या वेगाने व्यवसाय वाढ्वूच शकणार नाही असं मी छाती ठोक सांगू नाही शकत पण अशा वेळेस तज्ञ मंडळींचा सल्ला मोलाचा ठरतो. 
  • जेव्हा एखादा खूप चांगला गुंतवणुकीचा पर्याय तुम्हाला सापडतो तेव्हा तुम्हीच जगातले असा विचार करणारे पहिले गुंतवणूकदार आहात हा मनातला भ्रम पहिले काढून टाका, आज अनेक जण केवळ गुंतवणुकीचे नवीन नवीन पर्याय शोधण्यासाठीच धडपड करत असतात, अनेक मोठे व्यवसाय अशा पर्यायंची निवड करण्यासाठी खास तज्ञांची टीम बनवतात त्यामुळे एखादा नवीन पर्याय मला सापडला आहे आणि मी जर तो इतरांशी बोलून चर्चेत आणला तर मी राहीन बाजूला आणि ज्याचाशी मी बोललो तोच होईल श्रीमंत हा भाबडा विश्वास आता काढून टाका, उलट जितक्या जास्तीत जास्त लोकांशी तुम्ही बोलाल तितकं तुम्हाला नवीन ज्ञान मिळेल आणि कदाचित चुकीच्या गुंतवणुकीपासून तुमची सुटका होईल. जर तुम्हाला तुमचा मित्र मंडळींना याचा सुगावा लागू द्यायचा नसेल तर अशा वेळेस तज्ञ मंडळींचा सल्ला नक्कीच उपयुक्त पडतो, कदाचित त्या सल्ल्याचा फी पोटी थोडे पैसे जातील ही पण गुंतवणूक बुडण्यापेक्षा ते पैसे गेले तरी चालायला हरकत नसावी. 
  • Warren Buffet जेव्हा भारताच्या दौर्यावर आलेले तेव्हा त्यांनी एक रोचक विधान केलेले, मी सेमी-conductor व्यवसायात गुंतवणूक करण्यापेक्षा च्युईंगम बनवणाऱ्या   व्यवसायात गुंतवणूक करेन कारण मला एखाद वेळेस च्युईंगम कसे बनवतात हे कळेल पण सेमी-conductor चा व्यवसाय कसा करतात हे कळणं अवघड आहे.  जगातला सगळ्यात मोठ्ठा गुंतवणूकदार पण त्याला कळेल अशाच व्यवसायात पैसे गुंतवतो तर इतर आपल्या सारख्या सामान्य गुंतवणूकदराने तर हा नियम नक्कीच पाळला पाहिजे. जर एखादा व्यवसाय आपल्याला काळात नाही आणि इतर कोणाला तरी कळतो म्हणून आपण त्यात पैसे गुंतवत असू तर आपण कुठे तरी गहन चूक करतो आहे हे मानायला काहीच हरकत नाही. एखादा व्यवसाय समजावून घ्यायला म्हणून पैसे गुंतवले तर हरकत नाही पाच दहा हजार रुपये पण आयुष्य भराची पुंजी अशा पद्धतीने बहाल करणे हा अत्यंत चुकीचा निर्णय असू शकतो. 
  • बऱ्याचदा असे आढळून आले आहे कि बोगस गुंतवणुकीचा कंपन्या चालवणाऱ्या लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असते अशा मंडळींबाबत जर आपल्याला निश्चित माहिती असेल तरच गुंतवणूक करावी अन्यथा, गुंतवणूक तर जातेच पण बरेचदा कुठे तक्रार करायला पण तोंड राहत नाही.

  तेव्हा या निकषांचा विचार करून आणि तज्ञ मंडळींचा सल्ला घेऊन जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्ही चुकीचा गुंतवणुकी पासून वाचू शकता. तुमची गुंतवणुकीतील जोखीम कमी करू शकता. सगळ्यात महत्वाचं तत्व आपण लक्षात ठेवायला पाहिजे ते म्हणजे एखादी गुंतवणूक स्वप्नवत मोहक असेल तर ते वास्तव नसून स्वप्नच असायची शक्यता जास्त आहे. स्वकष्टाने कमवलेल कुठल्या तरी थातूर मातुर गुंतवणुकीत गमवायच हे तुमच्या यशाचे गमक निश्चितच नसावं.