जामतारा हि भानगड नक्की आहे तरी काय ?

178

आर्थिक घोटाळे या विषयावर गेली कित्येक वर्षे मी लिखाण करतो आहे. व्यवसायचाच भाग असल्याने या क्षेत्राशी तास माझा जवळच संबंध आला आहे. आर्थिक घोटाळे शोधणे हा आता एक मोठा व्यवसाय आहे. पण या व्यवसायाचा उगमच झाला तो मुळात क्रेडिट कार्ड संबंधित घोटाळे शोधण्यासाठी. आता तर बँकिंग क्षेत्रात घोटाळे शोधायला स्वतंत्र खाते असते. अनेक कर्मचारी तिथे काम करतात आणि माझ्या माहिती प्रमाणे हे सगळे कर्मचारी जामतारा नावाच्या एका छोट्या जिल्ह्याला मनोमन धन्यवाद देतात.

देशभरातल्या एकूण ऑनलाईन बँकिंग घोटाळ्यांपैकी ८० टक्के घोटाळ्यांची सूत्रं हि या गावातून हलवली जातात. गावच म्हणायचं या जिल्ह्याला कारण संपूर्ण जिल्ह्याची लोकसंख्या हि केवळ ८ लाख आहे. चारी बाजूला जंगल, नद्या, दलदलीचा प्रदेश, छोट्या छोट्या टेकड्या असणारा हा जिल्हा अत्यंत गरीब लोकांचा. काही वर्षांपूर्वी या जिल्ह्यातील रहिवाश्यांकडे कच्ची घरं आणि काही मोपेड घराबाहेर लागलेल्या दिसायच्या पण आज इथे भरपूर पक्की घर, चार चाकी आणि सुबत्ता नांदते आहे. त्यांच्या अंगी असलेल घोटाळे करायचं कसब हि या जिल्ह्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे.  या विषयावर नेटफ्लिक्सने एक डॉक्युमेंटरी पण बनवली आहे. 

काही वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या बँक खात्यातून पाच लाख रुपये गायब झाले. याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या पत्नी व खासदार परनीत कौर यांच्या खात्यातून सुमारे 23 लाख रुपये, केंद्रीय मंत्र्यांच्या खात्यातून सुमारे दोन लाख रुपये, केरळच्या खासदारांच्या खात्यातून दीड लाख रुपयांची फसवणूक हे सगळे कसब जामतारावासियांचे होते असे म्हणतात. पण या प्रसिद्ध प्रकरणांव्यतिरिक्त, असे हजारो लोक आहेत ज्यांचे पैसे त्यांच्या खात्यातून गायब झाले आणि त्यांना ते पैसे पुन्हा कधीही मिळालेले नाहीत. 

इथल्या घराघरात हा खेळ चालतो. संपुर्ण कुटूंब या फ्रॉड करण्याच्या बिझनेसमध्ये गुंतलेलं असततं. त्यासाठी भांडवल म्हणजे हजारो मोबाईल क्रमांकाचे एक पान आणि स्वतःचा एक मोबाईल.

पुर्वी घरात बसूनच काम केलं जात होतं. २०१३ मध्ये पोलीसांच्या रडारवर आल्यानंतर दोन-चार जणांच्या टोळक्याने जंगलात बसून आता हा खेळ खेळला जातो.   

पोलीस शोधायला आल्याची टिप मिळाली की जंगलात लपण्याचा फायदा घेता येतो. त्यामुळे इथले चोर कधीच पोलीसांच्या तावडीत सापडत नाहीत. त्यामुळेच कितीही सर्च ऑपरेशन राबवली तरी हा खेळ मात्र बिनबोभाटपणे चालू आहे.

यांची काम करायची पद्धत पण  सोपी असते, प्रथम लोकांना कॉल करून, ज्या बँकेत त्या व्यक्तीचे खाते आहे अशा बँकेतून बोलत आहेत असं सांगायचं. यानंतर ते ग्राहकांना आपले खाते अपडेट करण्यास किंवा खाते बंद होणार आहे किंवा इतर अनेक बहाण्याने त्यांच्या बँकेशी संबंधित वैयक्तिक माहिती गोळा करतात आणि काही मिनिटांत त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतात. जामताराचा एक ‘हॅलो’ म्हणजे खातं रिकामं.  

फोनवर फसवून ट्रान्सफर करण्यात आलेले पैसे जातात ते एका अकाऊंटवर. असा फोन करणारे आपला अकाऊंट नंबर देत नाहीत. ते काय करतात तर इथल्याच माणसांसोबत कमिशन बेसिसवर काम करतात. त्यांच्या अकाऊंटवर पैसे फिरवतात. त्याला वीस टक्के आणि आपणाला ८० टक्के घेतात. दूसऱ्याच्या अकाऊंटचा वापर फक्त पोलीस आपल्यापर्यन्त पोहचू नये म्हणून केला जातो. पुढच्या माणसाला पण २० टक्के घरबसल्या मिळत असल्याने ते खूषच असतो.एकाला धरून दूसरा आणि दूसऱ्याला धरून तिसरा असं करत संपुर्ण परिसर यात गुंतला.

विशेष म्हणजे यात असणारी सगळी पोरं ही पाचवी दहावी नापास असणारी आहेत तरी ती ऑनलाईन सेक्टरमध्ये मास्टर म्हणून ओळखली जातात.