जॅक मा चीन मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसे बनले ?

271

जॅक मा यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९६४ रोजी चीनमधील एका गरीब घरात झाला. शाळेत दोनदा नापास झाला. हायस्कुल मध्ये तीनदा नापास झाला. पुढे ज्या विद्यापीठामध्ये त्याला प्रवेश घ्यायचा होता त्याची प्रवेश परीक्षा तो तीनदा नापास झाला. जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश करण्याचे त्याचे स्वप्न १० वेळा भंगले. 

पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने नोकरीसाठी प्रयत्न सुरु केले पण दुर्दैव हात धुवून त्याच्या मागे लागले होते. कमीत कमी ३० ठिकाणी त्याने नोकरी मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. जेव्हा केएफसीने चीनमध्ये प्रवेश केला तेव्हा २४ उमेदवार मुलाखतीसाठी गेले होते. २४ पैकी २३ जणांची निवड झाली. फक्त एकालाच नाकारण्यात आले. तो उमेदवार होता जॅक मा. 

शेवटी एका विद्यापीठात तो शिक्षक म्हणून रुजू झाला आणि मग इंटरनेटच्या संपर्कात आल्यावर त्यानेव्यवसाय चालू करायचा निर्णय घेतला. पाश्चिमात्य इंटरनेट आणि संकेतस्थळांवर बंदी असणाऱ्या चीनमध्ये दोन दशकांपूर्वी ‘ई-कॉमर्स’ या क्षेत्राचा विचारही अभूतपूर्वच होता. त्यावेळी त्यांचे स्पर्धक अमेरिकेच्या ‘सिलिकॉन व्हॅली’मध्ये मोठ्या भांडवलासह उतरले होते. 

मात्र, जॅक मा यांनी १७ सहकारी व ६० हजार डॉलर्सच्या भांडवलासह श्रीगणेशा केला. २०१४ मध्ये अमेरिकेच्या ‘वॉल स्ट्रीट’वर अलिबाबाची नोंदणी करून २५ अब्ज डॉलरचे भांडवल उभे केले.चीन मध्ये ज्या तीन कंपन्यांना बॅट म्हणून संबोधले जाते त्या बैदु, अलीबाबा आणि टेन्सन्ट यात आज अलिबाबाची संभावना होते.  

अलीबाबा या जॅक माच्या कंपनी मध्ये सॉफ्टबँक आणि गोल्डमॅन सॅक्स ह्यांनी घसघशीत गुंतवणूक केली. त्याने स्वतःच्या राहत्या घरी सुरु केलेली कंपनी पुढे जाऊन चीनमधील तसेच जगातील सगळ्यात मोठ्या ऑनलाईन कंपन्यांपैकी एक बनली.
आयुष्याच्या सुरुवातीला अपयश ज्याच्या पाचवीलाच पुजले होते अशा जॅक माने वयाच्या ३१ व्या वर्षी यशाची चव चाखली.

सध्याच्या घडीला जॅक मा हा चीन मधील सर्वात श्रीमंत माणूस आहे. आशिया खंडातील दुसरा तर जगातील १०० सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्याची गणना होते. त्याची एकूण संपत्ती ४४ बिलियन डॉलर्स एवढी आहे.

एवढा श्रीमंत असून पण जॅक मा हा खूप विनम्र आहे. तसेच त्याच्या संपत्तीचा मोठा हिस्सा तो कायम दान करतो. उद्योग जगतातील अनेक नावाजलेल्या पुरस्कारांनी त्याला गौरविण्यात आले आहे.

संकटातून मार्ग काढण्यास जर आपण शिकलो तर यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली जाऊ शकतात.

आयुष्यात प्रचंड मेहनत करायची तयारी असेल तर रंकापासून राव पण बनता येते हेच खरे.