डार्कवेब – माहितीचे काळेकुट्ट आंतरजाल

डेटा चौर्याचे प्रकार आपण सर्रास ऐकत असतो पण कधी विचार केला आहे का कि हा चोरलेला डेटा विकत घेता कोण ? हे विकत घेणारे लोक भेटतात कुठे ?

811

गूगल मुळे आपला आयुष्य फार सोप झालय, गुगल जे दाखवतं तेवढच जग आहे असं आपल्याला वाटायला लागतं, पण प्रत्यक्षात गूगल वर प्रत्यक्ष आंतरजालावरील केवळ  ४% ते १०% टक्केच गोष्टी दिसतात.  

आंतरजाल हा माहितीचा खूप मोठा स्रोत आहे, ज्ञात माहीती नुसार जगात किमान २ अब्ज संकेतस्थळं उपलब्ध आहेत. ज्यात विकीपिडीया, गुगल फेसबुक वगरेंचा अंतर्भाव होतो.  पण या व्यतिरिक्त आंतरजालावरील ९०% माहिती हि कधीच दिसत नाही. ती का दिसत नाही हे समजावून घेण्यासाठी पहिले आपल्याला आंतरजालाच्या ३ प्रकार समजावून घ्यावे लागतील.

सर्फेस वेब – हा माहितीचा स्रोत म्हणजे जो आपल्याला सहजपणे दिसतो, फेसबुक,  याहू, गूगल किंवा कोणतेही डॉट कॉम किंवा डॉट नेट ने संपणारे संकेतस्थळ. 

डीप वेब – हे मायाजाल आहे, इथे फक्त ठराविक लोकांनाच ठराविक माहिती दिली जाते जसे कि बॅंक ट्रान्जेक्शन्स, मेडिकल रेकाॅर्ड्स, कायदेशीर कागदपत्र , शास्त्रीय संशोधन, सरकारी कागदपत्रे आदी माहीती गुप्त ठेवली जाते. 

डार्क वेब – हे मात्र मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी स्वरूपाचं आंतरजाल आहे ज्यात आयपी ॲड्रेस जाणिवपुर्वक लपवला जातो. आयपी ऍड्रेस वरून तुमची ओळख आंतरजालावर केली जात असते. डार्क वेब वरूनच सगळ्या खास वेबसाईट्स केवळ एका खास वेबब्राऊजरमधुनच ॲक्सेस केल्या जाऊ शकतात. 

डार्क वेब हा मोठा क्लीष्ट प्रकार आहे, क्रोम किंवा फायरफॉक्स हा आपल्या नेट सर्फिंगचा अविभाज्य भाग आहे. तसाच डार्क वेबवर तुम्हाला संकेतस्थळावर पोहचायला द ओनियन राउटर वापरावा लागतो. क्रोम किंवा फायरफॉक्स वरून आपण डार्क वेब नाही पाहू शकत.   

आंतरजाळाच्या या अफाट आणि काळ्या खोलीत अनेक रहस्य लपली आहेत. अति-गोपनीयता हवे असणारे लोक, अतिरेकी, गुन्हेगार, मनोविकार रूग्ण, गुप्तहेर संघटना तसेच विध्वंसक मनोकामना बाळगणाऱ्या लोकांसाठी डार्क वेब हे एक खुलं व्यासपीठ आहे. आयपी ऍड्रेस सतत वेगळ्या वेगळ्या सर्व्हर्सवर जाऊन आदळत असल्यामुळे तो शोधणे शक्य नसतं, अजून तरी असे तंत्रज्ञान विकसित झाला नाही आहे जे डार्क वेब वरील संकेतस्थळांच्या मालकांना शोधून त्यांना दंड करू शकेल. काही काळा पूर्वी अमेरिकेने सिल्करूट या डार्क वेब मधील अमेझॉन समजल्या जाणाऱ्या बाजारपेठेवर दंडात्मक कारवाई केलेली हि अपवादात्मक.  

ज्याप्रकारे सर्वसामान्य लोक सर्फेस वेब वरून कपडे, अन्नधान्य, जिनसा व इतर जिवनाश्यक वस्तु मागवतो त्याच पद्धतीने बदमाश, चोरटे, भुरटे, ड्रग विक्रेते या सिल्करूट वरून चरस, गांजा, लोकांचे चोरलेले क्रेडिट कार्ड नंबर्स विकत घेत असत. डार्क वेब वर सर्वात जास्त व्यवहार होतात ते चोरलेल्या माहितीचे. आपण रोज बातम्या पाहतो या कंपनीच्या वापरकर्त्यांची माहिती चोरली, त्या हॉटेलच्या वापरकर्त्यांची माहिती चोरली वगैरे, हि सगळी चोरलेली माहिती कधी क्लोन केलेल्या कार्डावर भरली जाते तर कधी हि माहिती पुढचे हल्ले करायला वापरली जाते.   

लष्करी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी सुरू झालेल्या संशोधनातुन आपल्याला आज माहीत असलेल्या इंटरनेटचा शोध लागला. अगदी त्याचप्रमाणे २००२ ला अमेरिकेच्या नौदल संशोधन प्रयोगशाळेत डार्क वेबची कल्पना उदयास आली. नौदलाचे संदेशवहन हे त्यांना पाहीजे तेवढं गुप्तरित्या होत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. संदेशवहन अतीगुप्ततेने व सुरक्षिततेने होण्यासाठी त्यांनी नविन प्रणालीची निर्मीती केली

ज्याप्रमाणे आडव्या कापलेल्या कांद्याच्या फोडीत वेगवेगळे आणि वाकडे तिकडे थर दिसतात अगदी तसेच ओनियन ब्राऊजर काम करतो, आपला आयपी ऍड्रेस हि आपली अंतर्जालावरची ओळख असतो तो ऍड्रेस वेगळ्यावेगळ्या सर्वर वर धडक मारत संकेतस्थळावर जाऊन पोचतो तेव्हा त्याचा पुन्हा माग काढणं हे अशक्यप्राय काम असत.  डार्क वेबवर उपलब्ध असलेल्या संकेतस्थळांचे पत्तेदेखील गुप्त ठेवले जातात. जे सहजासहजी मिळत नाहीत.

भारतात ही टाॅर वेबसाईट वापरणे गुन्हा नसला तरी डार्क वेब वापरून बेकायदा कामं करणे गुन्हा आहे. टाॅर जरी मोफत साॅफ्टवेयर असलं तरी ते डाऊनलोड केल्यावर नेमकं कुठं जायचं काय शोधायचं हे समजावून घेणं मोठं जिकिरीचं काम आहे, तुम्ही जर नवीनच असाल आणि टॉर सर्च इंजिनवर जर शोधाशोध करत बसलात तर तुम्हीच नको त्या गुन्हेगारांच्या विळख्यात अडकायचे शक्यता जास्त आहे तेव्हा सावधान डार्क वेब वापरणं गुन्हा नाही पण गुन्हेगारी विळख्यात अडकलात तर कुठे जाऊन पोचाल सांगता येणार नाही.