पाबलो एस्कोबार आणि त्याचे साम्राज्य

1830

नार्कोस हि मालिका नेटफ्लिक्स वर प्रचंड लोकप्रिय मालिका. सध्या सर्व जगात ड्रग माफिया आणि त्यांच्या साम्राज्याबद्दल लोकां मध्ये प्रचंड कुतूहल वाढायला लागलाय आणि त्या निमित्तानेच मनी लॉण्डरिंग काय असत हे पण लोकं समजायला लागली आहेत.

पाबलो एस्कोबारचा उल्लेख त्यावेळची वर्तमानपत्रं ‘किंग ऑफ कोकेन’ असा करत असत. त्याच्या टोळीचं नाव मेडेलीन कार्टेल असं होतं. मेडेलीन हे कोलंबियातलं एक शहर आहे. त्यावरुन त्यांच्या टोळीला हे नाव मिळालं होतं. जगातील सगळ्यात खतरनाक आणि मोठ्या गुन्हेगारी संघटनांपैकी एक असलेल्या मेडिलिन कार्टेलचा तो प्रमुख होता. असं म्हटलं जात की, त्याकाळी अमेरिकेतील ८० टक्के कोकेन पाबलो एस्कोबारची गॅंग पुरवत असे.

पाबलो एस्कोबारचा जन्म कोलंबियातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात १९४९ सालात झाला. कॉलेजच्या खोट्या डिग्र्या विकून त्याने गुन्हेगारी जगतामध्ये पाऊल टाकले. सुरुवातीच्या काळात तो स्मशानातून चोरी करायचा, नंतर हळू हळू गाड्यांची चोरी करू लागला. एका लोकल डॉनची हत्या करून त्याने गुन्हेगारी जगतामध्ये जम बसवायला सुरुवात केली.

कालांतराने त्याने अंमली पदार्थाच्या धंद्यामध्ये प्रवेश केला तेव्हापासून तो अधिक प्रसिद्ध आणि श्रीमंत होऊ लागला.

तस्करी करण्यासाठी पाबलो एस्कोबार हा अनेक पद्धतींचा वापर करायचा. किंबहुना ह्याच कामासाठी एक विमान पण विकत घेण्यात आले होते ज्याच्या मागच्या सीट पण काढून त्या जागी अंमली पदार्थ ठेवले जायचे. इतकेच नव्हे तर विमानाच्या टायरमध्ये पण कोकेन भरले जायचे. माल साठविण्यासाठी आणि पैसे लपवून ठेवण्यासाठी एक छोटे बेट पण विकत घेण्यात आले होते. चपलांपासून ते निर्यात केल्या जाणाऱ्या माशांमध्ये, धान्याच्या ट्रकमध्ये, जहाजांमध्ये, अश्या अनेक गोष्टींमधून अमली पदार्थाची तस्करी केली जायची.

पाबलो एस्कोबारला कोलंबिया देशाचा पंतप्रधान बनायचे होते. १९८२ सालात तो संसदेमध्ये निवडून पण आला होता पण त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आल्यामुळे त्याला तिथून राजीनामा द्यावा लागला. अमेरिकन सरकारने त्याच्या अटकेत मोठी भूमिका निभावलेली म्हणून त्याने १९८९ सालात कोलंबियामध्ये झालेले खतरनाक बॉम्ब हल्ले घडवून आणले असावेत अशी शक्यता वर्तवली जाते.

संसद सदस्य म्हणून निवडून आल्यावर त्याला सामाजिक सुधारणेचे काम दिले गेले होते, गरिबांसाठी घर, शाळा बांधायचं काम असल्याने अल्पावधीतच तो मेडिलिन ह्या त्याच्या शहरात प्रसिद्ध झाला. तिकडचे लोक त्याला रॉबिनहूड म्हणून ओळखायचे. गरीब लोकांसाठी घरे, शाळा, पैशाची मदत अशा अनेक गोष्टी तो स्वतःच्या शहरामध्ये करायचा. ह्याचाच फायदा त्याला पोलिसांपासून लपण्यामध्ये व्हायचा. कारण स्थानिक लोक त्याला वाचविण्याचे कायम प्रयत्न करत.

त्याच्या गुन्ह्यांची संख्या खूपच जास्त होती. पाब्लो एस्कोबारला पकडण्यासाठी एका विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली होती पण त्या पथकाला सुरुवातीच्या काळात खूपच अपयशाला सामोरे जावे लागले. रॉबर्ट मजूर हा पोलीस या टोळी मध्ये ५ वर्ष वास्तव्याला होता आणि तो सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचे आर्थिक विवेचन करायचा. त्याने मोठ्या प्रमाणावर या टोळीचे मनी लॉण्डरिंगचे व्यवहार पाहिले होते.याच्या जीवनावर इंफिल्ट्रेटोर नावाचा चित्रपट येऊन गेला.

शेवटी सरकारने एस्कोबार बरोबर वाटाघाटी करून त्याला आत्मसमर्पण करण्यास राजी केले. एस्कोबारच्या मागणीप्रमाणे सरकारने त्याच्यासाठी खास असे तुरुंग बनविले ज्यात पोलिसांना जायला परवानगी नव्हती. इतकेच नव्हे तर त्या तुरुंगाच्या काही किलोमीटरच्या परिघामध्ये पोलिसांना येण्यास बंदी होती. तिथे त्याला सर्व सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. पण काही काळाने त्याने तेथून पलायन केले.

आयुष्याच्या उत्तरार्धात त्याचा धंदा पूर्णपणे बंद होत आलेला. त्याच्या सर्व साथीदारांना पोलिसांनी एक तर मारून टाकले किंवा पकडले. त्यापैकी कित्येक जणांना जन्मठेप किंवा मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.

खूप वर्षे त्याचा पोलिसांबरोबर लपाछपीचा खेळ सुरू होता. १९९३ मध्ये तो लपलेल्या ठिकाणाचा पोलिसांना सुगावा लागला आणि त्याला कंठस्नान घालण्यात आले आणि जगातील एका मोठ्या तस्कराचे साम्राज्य संपलेतो तस्करीच्या धंद्यातून इतका श्रीमंत झाला की त्याच्या देशाने जागतिक बँकेकडून घेतलेले कर्ज (अंदाजे ७१,५०० कोटी रुपये) स्वतःच्या पैशातून फेडण्याचा प्रस्ताव त्याने देशासमोर ठेवला होता.