चला जाणून घेऊयात मोसाद म्हणजे काय ?

351

टूथपेस्ट म्हंटल्यावर जसं कोलगेट डोळ्यासमोर येते , वॉशिंग पावडर म्हंटल्यावर निरमा उच्चारले जाते किंवा फोटोकॉपी मशीनला आपण झेरॉक्स म्हणतो तसाच मोसाद हा शब्द इंटेलिजन्स शब्दाला समानार्थी म्हणून वापरला जातो.   

खर तर मोसादचा मराठी अर्थ मृत्यू. आपल्या देशाच्या शत्रूला शोधून, त्याला आपल्या देशात गुप्तपणे आणून त्याला यमसदनास धाडणे हे त्याचे महत्वाचे काम. शिक्षा दिल्यानंतर सर्व जगाला कळते, की अमुक-अमुक व्यक्तीला शिक्षा दिली गेली. 

४ मे १९४८ ला इस्त्राईल स्वतंत्र देश म्हणून नावारूपास आला. जगातले एकमेव ज्यु धर्मियांचे राष्ट्र. एकाबाजूने समुद्र आणि तीन बाजूने शत्रू राष्ट्रे. सर्व शत्रू राष्ट्रे इस्लाम धर्मीय आहेत. जगात कुठेही थारा न मिळालेल्या ज्यू धर्मियांचे राष्ट्र टिकवण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली आणि ह्याच घटनेतून १३ डिसेंबर १९४९ रोजी जन्माला आली ती ‘मोसाद’ नावाची गुप्तहेर संस्था.  

मोसादची औपचारिक स्थापना झाल्यापासूनच या नवीन संघटनेला अडचणींचा सामना करावा लागला. परराष्ट्र मंत्रालयाच्या राजकीय विभागाचे लोक हे प्रामुख्याने अमेरिका किंवा ब्रिटन यासारख्या देशांमध्ये राहून आलेले होते. मोसादच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश पाळायची त्यांची तयारी नव्हती. शेवटी पंतप्रधान बेन गुरियनच्या मध्यस्थीने हे ‘ बंड ‘ शमवण्यात आलं. जे अधिकारी मोसादच्या आदेशांचं उल्लंघन करतील किंवा त्यांचं पालन करणार नाहीत, त्यांना सरळ नोकरीवरून बडतर्फ करण्याची ताकीद देण्यात आली.

मोसादचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ‘कमालीची गुप्तता’, याच गुप्ततेमुळे मोसादमध्ये दुस-या कुठल्याही गुप्तचर संघटनेला आपला हेर घुसवणं जमलेलं नाही, पण याच मोसादनं जगातील सर्वच गुप्तचर संघटनेमध्ये आपले हस्तक घुसवलेले आहेत. त्यामागचा हेतू एकच-माहिती मिळवणं.  

मोसाद हि इस्त्राईल चे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियान यांची संकल्पना असल्याचे मानले जाते. ह्या संघटनेची कामाची पद्धत गुप्त आणि घातकी आहे. त्यांच्या कारवाया कमालीच्या गुप्त आणि निर्णायक असतात. इतर कुठल्याही देशाच्या गुप्तचर संस्था जे काम करतात, ते तर मोसाद करतेच, पण त्याशिवाय त्यांच्यावर अजून एक जबाबदारी आहे, ती म्हणजे जगभरात पसरलेल्या ज्यू धर्मीयांचं संरक्षण.

मोसादने त्याच अनुषंगाने जगभरात जिथे जिथे ज्यू धर्मीय स्थानिक राजवटींचा अन्याय सहन करत आहेत, तिथे तिथे शस्त्रांचं वाटप, ती कशी चालवायची याचं प्रशिक्षण, अगदीच गरज भासली तर तिथल्या लोकांना इझराईलमध्ये आणण्याची व्यवस्था करणं अशा स्वरूपाच्या अनेक कामगिऱ्या केलेल्या आहेत.

अडोल्फ हिटलरचा सहकारी अडोल्फ आईसमन ज्याने फूस लावून ज्यू लोकांना ट्रेनमधून गॅस चेंबर असलेल्या ठिकाणी नेले होते व तिथे त्यांना जीवे मारून टाकले होते. त्या अडोल्फ आईसमनला १९६० साली मोसादने कुणालाही खबर न लागू देता अर्जेंटिनामधून पकडून इस्रायलला आणले व तिथे त्याला इस्राएलच्या कायद्यानुसार पद्धतशीरपणे मृत्यदंड दिला. विशेष म्हणजे तत्पूर्वी कित्येक वर्षे अडोल्फ आईसमन अर्जेंटिनामध्ये नाव बदलून राहत होता.  

आतापर्यंत मोसादने बऱ्याच कारवाया पार पाडल्या आहेत. त्या पार पडे पर्यंत त्याची माहिती कोणालाच नसते पण एकदा का कारवाई संपली कि अवघ्या जगाला हि माहिती सांगितली जाते, हि माहिती देण्याचा एकाच उद्देश असतो मोसाद बद्दल जनमानसात दहशत निर्माण करणे.