..म्हणून पाश्चिमात्य देशांकडून ही आकड्यांची आदळआपट!

6

कोरोनाशी मुकाबला करण्यात भारताने अद्वितीय कामगिरी केली आहे, १३० कोटी लोकसंख्या असून देखील जगातील कोणत्याच कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारताचं नाव नाही ही गोष्ट बरंच काही सांगून जाते. पण कोरोनाच्या विरोधातील ही लढाई कोणत्याही एका माणसाचे यश नाही, हा अवघ्या भारतवासियांचा बदलेला दृष्टिकोन आहे. एक वेळ अशी होती कि भारत आणि अमेरिकेत कोरोना बाधितांचे प्रमाण हे सारखेच होते. आजच्या घडीला करोना च्या बाबतीत या अत्यंत उत्कृष्ट हेल्थकेयर सुविधा असलेल्या अमेरिकेसारख्या किंवा युरोपातल्या अगदी कमी- एका राज्याइतकी लोकसंख्या असलेल्या इटलीच्या तुलनेत भारताची परिस्थिती का आहे? रुग्णांचे आणि मृत्यूचं प्रमाण किती कमी आहे?

मी बरेचदा अस ऐकतो आहे की आपण टेस्टिंग कमी करतोय ! हे मान्यच आहे की कमी करतोय. पण जे टेस्टिंग करतोय त्यात करोना बाधित केसेस निघण्याचं प्रमाण किती आहे? तपासल्या गेलेल्या लोकांमधल्या फक्त ३ टक्के लोक करोनाबाधित आहेत तर कितीतरी युरोपियन देशात हे प्रमाण ३०-४०% इतकं जास्त आहे.

भारत टेस्टिंग का कमी का करतोय? याच सोपं कारण म्हणजे आज मितीला भारतात इतके किटस उपलब्धच नाहीयेत. जगात सगळीकडे या किटसचा तुटवडा आहे. म्हणून अगदी गरज असेल तिथंच टेस्टिंग केलं जातंय.

हे मान्य नसेल तर आयसीएमआरच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्व्हेमधले हे आकडे बघा. १५ फेब्रुवारी ते ३ एप्रिल या काळात भारतातल्या सगळ्या हॉस्पिटल मध्ये सिव्हियर अक्यूट रेस्पिरेटरी इलनेसमुळे आयसीयू मध्ये असलेल्या आणि खूप आजारी असलेल्या ६००० पेशंट्सचा सर्व्हे केला गेला. त्यातले फक्त १०४ रुग्ण करोना बाधित आढळले आहेत. म्हणजे फक्त पावणे दोन टक्के  आणि हे नंबर्स अवघ्या जगाला तोंडात बोटं घालायला लावणारे आहेत.

यावर आता काही मंडळी जे अमेरिका किंवा इतर प्रगत देशात स्थायिक आहेत ते ऑक्सफर्ड किंवा इतर कोणत्या संशोधन संस्थांच्या हवाल्याने असा सांगायचं प्रयत्न करीत आहेत कि भारतात हा आकडा किमान ५० पटीने अधिक आहे.

मग यावर असंही म्हटलं जातंय की सरकार माहिती लपवत आहे. बरं लपवत ही असेल.. गृहीत धरू या की हे खरंय. समजा करोना बाधित रुग्णांची संख्या सांगितली जातेय त्यापेक्षा खूप जास्त आहे. पण मग त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या? ती पण लपवली जाते का ?  ती लपवता येईल का आपल्या देशात? सर्वात पहिले म्हणजे भारत सारख्या देशात जिथे अंत्यसंस्कार महत्वाचे मानले जातात तिथे मृत्यूचा दाखला मागितला जातो, याचा अर्थ मृत्यू सरकार दरबारी नोंदवला गेला असला पाहिजे, मृत्यूचे कारण नोंदवलं गेलं असलं पाहिजे.

आता यामधील दुसरा मुद्दा असा आहे कि मोदी भक्त आणि मोदी विरोधक अशी दोन्ही प्रकारच्या लोकांची भारतातल्या विविध राज्यात सत्ता आहे आणि मृत्यूची नोंद हा महापालिकेचा किंवा नगर पालिकेचा विषय आहे म्हणजे पर्यायाने राज्य सरकारचा. ममता, अरविंद, उद्धव या सगळ्यांनी केंद्र सरकार सोबत षडयंत्र करून मृत्यूचे प्रमाण कमीच दाखवायचे ठरवले आणि यावर सगळ्यांचे एकमत झाले ? राजकारणी हि जमात सगळीकडे आपला फायदा पाहणारी असते कोणी तरी काही तरी लपवताय म्हंटल्यावर राजकीय पटलावर केवढी उलथापालथ झाली असती?

राजकारण्यांबद्दल मनात कितीही पूर्वग्रह असोत पण आज एक नागरिक म्हणून या सगळ्या राजकारण्यांकडे पाहायचा दृष्टिकोन बदललाय, आहे ना आमची सिस्टिम करप्ट, मान्यच आहे पण आज सगळे पोलीस न थकता रस्त्यावर उभे आहेत. गरिबांना खायला घालत, लॉक डाउन तोडणाऱ्यांना रोखत उभे आहेत, सरकारी कर्मचारी जीव तोडून काम करताहेत हे सत्य फक्त भारतात  राहणार्यालाच दिसू शकतं, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्ट हि प्रवृत्ती असलेल्या पाश्चिमात्य देशांना भारताच्या प्रत्येक चांगल्या कृतीत खोट दिसणारच. त्यामुळे बीबीसी काय किंवा आता ऑक्सफर्ड सारख्या संशोधन संस्था काय अवघ्या जगाला हे दाखवण्याच्या मागे आहेत कि आमचे कोरोनाचे मृत्यूसुद्धा तुमच्या उपायांपेक्षा श्रेष्ठच आहेत.

असो ! अजून एक महत्वाची बाब म्हणजे भारतासारख्या देशात सरकारी संस्थांकडून माहिती मागवायला माहितीचा अधिकार अस्तित्वात आहे, आजही मीडियाचा दबदबा आहे, इतके विरोधी पक्ष, इतक्या स्वयंसेवी संघटना, इतके मोबाईल फोन आणि हवं ते शूट करून हवं तिथे पोस्ट करायची मुभा असताना खरंच मृत्यू लपवता येतील का ? या प्रश्नाचं उत्तर कोणीच अ-भारतीय देऊ शकणार नाही. आकडेवारी अचूकच आहेत असं मी म्हणत नाही पण जसे कोरोनामुळे झालेले मृत्यू नोंदवले गेले नसतील तसेच कदाचित कोरोनामुळे ना झालेले मृत्यू पण कोरोना बाधितांचे म्हणून नोंदवले गेले असतील अशी देखील शक्यता आहे.  न्यूमोनियाने मरायला लागलेला पेशंट कोणताही डॉकटर आहे सरकारी रुग्णालयात पाठवेल. तिथं जर बेसुमार लोक मरायला लागले तर ते लपवता येईल का हा महत्वाचा प्रश्न हे टीकाकार विसरताहेत. तिथे जाऊन सर्वेक्षण करायची कल्पना आजवर एकाही पत्रकाराच्या डोक्यात आली नसेल का ? सरकार विरोधी पत्रकारितेला सगळ्यात जास्त प्रसिद्धी भारतात मिळते, वेगवेगळ्या विषयांवर रोज सरकारांना अडचणीत आणणाऱ्या पत्रकारांसाठी वाढीव मृत्यूचे प्रमाण हे आयतच कोलीत मिळाले नसते का या गोष्टी देखील या टीकाकारांनी  ध्यानात घेण्याची गरज आहे. भारतात आजही मीडियाला स्वातंत्र्य आहे, मीडियाची दडपशाही करणाऱ्या चीन किंवा सौदीमध्ये आपण राहत नाही आहोत!

भारताची याबाबतीत आजची परिस्थिती तरी अचंबित करणारी अशी आहे. त्यातच भारताने इतर देशांना औषधांचा पुरवठा चालू केला आहे. चीनची भारतात होणारी गुंतवणूक एका रात्रीत बंद केली आहे या सगळ्याने भारत आता हेल्थकेयर मध्ये महासत्ताम्हणून उदयाला येणार का हि चिंता आता अमेरिका आणि इतर युरोपियन देशांना भेडसावते आहे आणि कोणाच्या तरी हवाल्याने कोणती तरी आकडेवारी प्रसिद्ध करून भारत देशाला कमी लेखण्याचे उद्योग चालू झाले आहेत.

स्वतःला महासत्ता म्हणवणाऱ्या आणि  हेल्थकेयर साठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध असताना देखील चीनच्या विषाणू-आक्रमणाचा सामना हे देश करू शकले नाहीत, त्याउलट भारतात फार झगमगाट नाही, चकचकाट नाही, सरकारी रुग्णालय यथातथाच आहेत, साधनं नाहीत. पण भारत वासियांमध्ये प्रचंड राष्ट्रवाद निर्माण झाला आहे, देशासाठी म्हणून माणसे ऐकायला तयार आहेत.

त्याउलट पाश्चिमात्य देशातील नागरिकांचा ठसकाच वेगळा असतो त्यामुळेच त्यांनी कोरोनाला खूप सहज समजलं आणि चीनच्या समोर या देशांना सपशेल शरणागती पत्करावी लागली, या देशातल्या अनेक कंपन्यांचे समभाग चीनने अगदी कवडीमोल भावाने विकत घेतले आणि यांना चीनच्या घोंघावणाऱ्या वादळाची खरी जाणीव झाली आणि  हे खरे यांचे शल्य आहे. अमेरिका आणि युरोपिअन देश बिथरल्या सारखे वागत आहेत, चीनला विषाणूच्या संक्रमणाची बिलं पाठवत आहेत.  या उलट भारत एखाद्या परिपक्व देशाप्रमाणे चीनचे आर्थिक, जैवशास्त्रीय आणि तंत्रज्ञानाचे हल्ले शांतपणे परतवून लावत आहे, बदल हि भविष्याची नांदी आहे हे या पाश्चिमात्य देशांना अजून मान्यच होत नाही आहे म्हणून हि सगळी आकड्यांची आदळआपट .