व्यापारयुद्धात चीनला ऍपलची गरज भासणार

311

अमेरिका आणि चीन यांच्या मधील व्यापार युद्ध आता शिगेला पोचल  आहे दोघांचे भांडण तिसऱ्याच लाभ या उक्ती प्रमाणे भारत पण या व्यापार युद्धातून काही लाभ होईल अशी आस लावून बसला आहे, पण दिवसेंदिवस हे युद्ध भडकतंच चालले आहे. चीनच्या बलाढ्य तंत्रज्ञान कंपनीवर अमेरिकेने निर्बंध आणल्यानंतर चीन देखील संधीच्या शोधात होताच, आणि हॉंगकॉंग मधील निदर्शकांना दटावतानाच त्यांनी अँपल या अमेरिकेतील अति महाकाय कंपनीवर निशाणा साधला. 

ऍपल विरूध्द चीन सरकारया वादाचं मूळ सध्या हॉंगकॉंग मध्ये होत असलेल्या चीनविरोधी निदर्शने आणि अमेरिका-चीन दरम्यानच्या व्यापार युद्धात आहे.

याला आपण संघर्ष नाही म्हणू शकत कारण हा वाद चीन सरकारच्या बाजूने पूर्णतः एकतर्फी असल्याचे जाणवते. ॲपल सध्या तरी व्यापार युद्धात बळीचा बकरा ठरत आहे. हाँगकाँग मध्ये चालू असलेल्या निदर्शनांमध्ये आंदोलक HKmap.live या नकाशा प्रणालीचा उपयोग करताना आढळून आले. 

ही प्रणाली वापरून आंदोलनाची आणि पोलिसांच्या स्थाननिश्चितीची जागा शोधण्यात येते. आणि फक्त या सुविधेसाठीच ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. HKmap.live चे ॲप्लिकेशन गूगल आणि ॲपलच्या स्टोर वर उपलब्ध होते जे चीन सरकारच्या धमकी नंतर ऍपलने आपल्या ॲप स्टोर वरून काढून टाकले.

हेरगिरीच्या कारणांवरून अमेरिकेने चीनच्या हुआवेई कंपनीवर निर्बंध लादले. चीनच्या लोकांनी हा राष्ट्रवादाचा मुद्दा बनवला आणि हुआवेईच्या समर्थनार्थ ऍपल कंपनीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.

अमेरिकेने हुआवेईवर निर्बंध लादले त्याप्रमाणे चीन सरकारने जाहीररीत्या ऍपल विरुद्ध कारवाई अजून तरी केली नाही पण चीन-अमेरिका दरम्यान चालू असलेल्या व्यापार युद्धात चीन सरकार अप्रत्यक्षपणे ऍपलला नुकसान पोहोचवत आहे.

चीन मध्ये व्यवसाय करणाऱ्या मोठ्या कंपनींच्या यादीत ॲपल कंपनी २०१८ च्या तुलनेत ११ व्या क्रमांकावरून २०१९ साली २४ व्या क्रमांकावर घसरली आहे. व्यापार युद्ध सुरु होण्या अगोदर म्हणजेच २०१७ साली ॲपल ५ व्या क्रमांकावर होती.

असे असले तरी ऍपल आणि चीन ला एकमेकांची गरज आहे. चीन ही ॲपलसाठी आठवी मोठी बाजारपेठ आहे. ऍपलने गुंतवणुकीद्वारे चीनमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ४८ लाख रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. त्यातच आता एक कायदेशीर बाब उपस्थित झाली आहे. फॉक्सकॉन हि चीन मध्ये ऍपलच्या फोनचे उत्पादन करते, या कंपनीने मोठ्या प्रमाणात अस्थायी कर्मचाऱ्यांची भरती केली असे त्यांच्यावर आरोप आहेत.  

चीनमध्ये १०% पेक्षा जास्त अस्थायी कर्मचारी भरती करता येत नसताना फॉक्सकॉनने ५०% पेक्षा जास्त अस्थायी कर्मचारी भरले असा त्यांच्यावर आरोप आहे.  ऍपलवर सरसकट निर्बंध लादणं चीनला परवडणार नाही कारण आता मुद्दा केवळ गुंतवणुकीचा किंवा कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नाही आहे. 

टीम कूक हा ऍपलचा प्रमुख अत्यंत धोरणी व्यावसायिक आहे, त्याने मोठ्या प्रयासाने चीन मध्ये एक उत्तम उत्पादन क्षमता विकसित केली आहे, कित्येक हजार छोट्या व्यावसायिकांचे जाळे त्याने चीन मध्ये विणले आहे, आज ऍपलला जर अशी एखादी क्षमता दुसऱ्या देशात विकसित करायची म्हंटली तर किमान १० वर्ष तरी कालावधी लागणार आहे आणि दहा वर्ष मागे जाणे या कंपनीला परवडणार नाही आहे, म्हणूनच टीम कूक आपले सर्व वजन पणाला लावून चीनच्या बाजूने  व्यापार युद्धात अमेरिकेच्या बाजूने वाटाघाटी करत आहे, कारण अमेरिकेने जर कर वाढवले तर त्याचा फटका ऍपलला जास्त बसणार आहे. हुवेईमुळे अमेरिकेला काहीच फरक पडत नव्हता म्हणून त्यांच्यावर बंदी घालायचे धाडस अमेरिका करू शकली पण ऍपल हा आपल्याच संघातला खेळाडू असल्याने कितीही कुरबुरी झाल्या तरी चीन ऍपलला सांभाळून घेणार हे नक्की.