व्हॉट्सएपला फेसबुकने १६ बिलियन डॉलर्स का दिले ?

267

मी जेव्हा नुकतच हॉटमेल वापरायला लागलो होतो तेव्हा मला नेहमी एक प्रश्न  पडायचा की पोस्ट खातं जर आपल्याकडून पात्र पोचवायचे पैसे घेतं तर हॉटमेल आपल्याला सेवा फुकट का देतं ? तो काळ वेगळा होता, त्या काळात डिजिटल साक्षरता देखील फारशी नव्हती त्यामुळे आपल्यावर हॉटमेल का मेहेरबान आहे हे मला कळत नव्हतं. साबीर भाटिया या भारतीय माणसाने चालू केलेली हि कंपनी मग कित्येक कोटी डॉलर्सला मायक्रोसॉफ्टने विकत घेतलेली मला आठवत. उत्पन्न नसलेल्या कंपनीला इतक्या महाग किमतीला का बरं कोणी विकत घेत असावं ?  

डिजिटल जग हे जाहिरातींवर चालते, वापरकर्त्याला सगळं काही फुकट देऊन त्यांचा महत्वपूर्ण डेटा डिजिटल युगातील कंपन्या मिळवतात. फेसबुक असेल किंवा गूगल असेल या कंपन्या जाहिरातदारांच्या भरोशावरच मोठ्या बनतात.  

फेसबुक काय व्हॉट्सएप काय किंवा इंस्टाग्राम काय या सेवा तर वापरकर्त्याला फुकटात मिळतात पण डिजिटल युगाचा एक खूप महत्वाचा मंत्र आहे जर एखादी वस्तू अथवा सेवा काही खर्च न करता फुकटात मिळत असेल तर त्या उत्पादक कंपनीसाठी तुम्ही स्वतः च एक उत्पादन आहात. तुम्हाला म्हणजेच तुमच्या माहितीला विकून या डिजिटल कंपन्या पैसे कमावतात.  

म्हणूनच तर फेसबुकने व्हाट्सएपला १६ बिलियन डॉलर्सला खरेदी केले. जगात व्हॉट्सऍप चे कित्येक कोटींमध्ये यूजर्स आहेत. दररोज सुमारे 600 कोटी पेक्षा जास्त मेसेज हे व्हाट्सएपद्वारे पाठवले जातात. हाच डेटा फेसबुक त्यांच्या जाहिरातदारांना विकते. 

आपण जेव्हा आपण फेसबुक चालू करतो त्यावेळेस मुखपृष्ठावर काही जाहिराती दिसतात. या जाहिराती आपल्या आवडीशी संबंधित असतात. उदाहरणार्थ जर मी एखादे घड्याळ घेण्यासाठी ॲमेझॉन ,फ्लिपकार्टवर सर्च केले परंतु घेतले नाही अथवा ते मी माझ्या व्हाट्सअपवर मित्राला पाठवले तर काही दिवसांनी मला माझ्या फेसबुकच्या होमपेजवरही त्या घडाळ्याशी संबधित एक जाहिरात दिसायला लागते. याला रिटारगेटिंग असे देखील संबोधले जाते. म्हणजे तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे तुमच्या आवडीच्या वस्तूची जाहिरात तुम्हाला दिसत राहते. 

फेसबुक आणि व्हाट्सएपचा डेटा हा आपल्या जाहिरातीच्या बिजनेससाठी वापरतो. आपण कुठे आहोत? आपलं नाव? आपण कोणत्या गोष्टी शेअर करतो ? आपल्याला कोणत्या गोष्टी आवडतात ? व कोणत्या नाही? आपला व्यवसाय कोणता आहे? आपले नातेवाईक कोण आहेत? त्यांच्यासोबत आपण कसे वागतो? अशा सूक्ष्म गोष्टींचं तपशील फेसबुक आणि व्हॉट्सऍपच्या डेटावरून करतात. प्रत्येक गोष्टीची नोंद त्यांच्या सिस्टीम मध्ये स्टोर होते. त्यानुसार ते युजर्सची विभागणी करतात. आवडी-निवडी नुसार वयानुसार,व्यवसायानुसार, राहत असलेल्या ठिकाणानुसार, सर्व बाबींची दररोज पडताळणी करून त्यांची विभागणी केली जाते.

आता ज्यांना आपले प्रॉडक्ट विकायचे आहे अशा कंपनी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, किंवा इतर कोणताही जाहिरातदार त्यांच्या जाहिरातीसाठी फेसबुकशी संपर्क करतात. जाहिरात प्रकाशित करण्यासाठी फेसबुक त्यांच्याकडून पैसे घेतं . 

नंतर ही जाहिरात टार्गेटेड(लक्षित) व्यक्तीच्या होम पेजवर दाखवली जाते. त्यानंतर संबंधित युजर त्या लिंक वर जाऊन त्यांचे प्रॉडक्ट खरेदी करतात. असा या कंपन्या आपला सेल्स वाढवतात अथवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरतात .

एका अंदाजानुसार फेसबुक आपला 95 टक्के महसूल हा जाहिरातीच्या माध्यमातून कमावतो. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग हा जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पाचवा आहे. आपला महत्वपूर्ण डेटा हा दुसऱ्या कंपनी ला देखील विकून पैसा कमावतात याचे उदाहरण म्हणजे सध्या चर्चेत असलेला केंब्रिज ऍनालिटिकल डेटा घोटाळा..