स्टार्टअपच्या व्यवसायात मार्केटिंग महत्वाचं

191

स्टार्टअप म्हणलं कि नुसती चांगली कल्पना असून चालत नाही त्यासाठी मार्केटिंग पण करता आली पाहिजे. अनेक स्टार्टअप्स या केवळ उत्पादनाची उत्तम जाहिरात करता यावी यासाठी मार्कटिंग डॉलर्स गुंतवणुकीतून उभे करतात. भारतात अमूलच्या जाहिराती उच्च दर्जाच्या मानल्या जातात. भारताबाहेर अशीच एक गाजलेली जाहिरात काही दिवसांपूर्वी चर्चेत होती ती म्हणजे बर्गरकिंग ची २०१८ सालमधली मोबाईल एपची जाहिरात.     

प्रतिस्पर्धी मॅकडोनाल्ड्सच्या स्टोअरमध्ये गेलेल्या ग्राहकांना स्वतःच्या कंपनीचा बर्गर फक्त एका पैशामध्ये देण्याची बर्गर किंगने वापरलेली युक्ती. जाहिरात विश्वातील ही सर्वात आगळीवेगळी कल्पना वापरत बर्गर किंगने मॅकडोनाल्ड्स स्टोअरमध्ये बसलेले किंवा त्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये फिरत असणारे ग्राहक अक्षरशः आपल्या स्टोअरमध्ये खेचून नेले. बर्गर क्षेत्रातील दोन नावाजलेल्या कंपन्या म्हणजे मॅकडोनाल्ड्स व बर्गर किंग. जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेल्या ह्या दोन कंपन्यांमध्ये शीतयुद्ध कायम सुरू असते.

बर्गर किंग कंपनीने केलेल्या संशोधनात असे आढळून आले की ग्राहक बर्गर मागविण्यासाठी सामान्यतः मोबाईल ऍपचा वापर करत नाहीत. तसेच आजची तरुणाई (अमेरिकेतील) बर्गर, पिझ्झा अशा खाद्यपदार्थांकडे आरोग्यासाठी अपायकारक पदार्थ ह्या दृष्टीकोनातुन बघतात आणि खाण्याचे टाळतात.

ह्यावर उपाय म्हणून ४ ते १२ डिसेंबर २०१८ ह्या कालावधीमध्ये बर्गर किंग कंपनीने अमेरिकेत व्हूपर डीटुअर कॅम्पेन चालविला. हा कॅम्पेन बाजारात येण्याआधी जवळपास एक वर्ष कित्येक लोकांनी पडद्याआड मेहनत घेतली होती. कॅम्पेन एकदम साधा पण भन्नाट होता. ह्या कॅम्पेनमध्ये भाग घेण्यासाठी ग्राहकाला बर्गर किंग कंपनीचे मोबाईल ऍप डाऊनलोड करणे अनिवार्य होते.

समजा एखादा ग्राहक मॅकडोनाल्ड्सच्या स्टोअर मध्ये गेला असेल किंवा त्यांच्या स्टोअरपासून ६०० फूट अंतराच्या परिघामध्ये असेल आणि त्याने बर्गर किंगचे मोबाईल ऍप उघडून त्यातून बर्गर ऑर्डर केला तर तो फक्त १ पैशाला मिळणार होता. ऑर्डर केलेला बर्गर पुढच्या एका तासामध्ये लगतच्या बर्गर किंग स्टोअर मधून घेता येणार होता. म्हणजे बसायच मॅक्डोनाल्ड्सच्या दुकानात थंड हवा खात आणि माल मागवायचा बर्गरकिंग कडून. 

वरकरणी खूप विचित्र वाटणाऱ्या ह्या कॅम्पेनचे बर्गर किंग कंपनीला प्रत्यक्षात खूप फायदे झाले.

  • प्रतिस्पर्धी मॅकडोनाल्ड्सचे अनेक ग्राहक आपल्याकडे वळविण्यात बर्गर किंग कंपनी यशस्वी झाली.
  • कॅम्पेन काळामध्ये कंपनीच्या मोबाईल ऍपवरून होणारी विक्री तब्बल ३००% एवढी भरघोस वाढली. तर कॅम्पेन संपल्यानंतर पुढे २००% ने वाढली.
  • स्टोअरला भेट देणाऱ्या ग्राहकांच्या संख्येमध्ये विक्रमी वाढ होऊन मागील ४.५ वर्षातील उच्चांक गाठला.
  • इतके दिवस आयओएस आणि अँड्रॉइड ऍप स्टोअरमध्ये बरेच मागे असलेले बर्गर किंगचे मोबाईल ऍप चक्क पहिल्या क्रमांकाला पोचले. ऍपल आयओएस स्टोअर मध्ये काही दिवस आधी हे ऍप ६८६ क्रमांकावर होते तिथून उडी मारत पहिला क्रमांक पटकाविला.

अशा प्रकारे एका अफलातून जाहिरात कल्पनेचा वापर करून बर्गर किंगने एकाच दगडामध्ये अनेक पक्षी मारले होते. तसेच ह्या अनोख्या कॅम्पेनसाठी अनेक जाहिरात तज्ज्ञांनी तसेच व्यावसायिकांनी कंपनीचे भरभरून कौतुक केले. तसेच ह्या कॅम्पेनला जाहिरात क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार पण प्रदान करण्यात आले.