स्टार्टअप कल्पना कशा सुचतात ?

241

स्टार्टअप म्हणजे नवीन कल्पनांचा सुकाळ. एखादा क्लिष्ट किंवा जटिल प्रश्न सोडवायच्या कल्पनेवर आधारीत केलेल्या व्यवसायाची निर्मिती. हे सदर लिहीत असताना मी जेव्हा काही नव-युवकांशी बोलत होते तेव्हा त्यातल्या अनेक जणांनी मला एक प्रश्न विचारला कि स्टार्टअपची नोंदणी, भांडवल, मनुष्यबळ वगैरे तरी पुढच्या गोष्टी झाल्या पण स्टार्टअपसाठीच्या कल्पना मुळात सुचतात कशा ? खरं सांगायचं तर आज कल्पनांचा पण बाजार मांडला गेला आहे, इंटरनेटवर सर्वोत्कृष्ट १० स्टार्टअप कल्पना या विषयांवर अनेक ब्लॉग्स वाचायला मिळतात. पण कल्पना ते प्रत्यक्ष स्टार्टअप हा एक प्रवास असतो अशा इंटरनेट वर कल्पना वाचून स्टार्टअप चालू करता येत नाही.        

कल्पना सुचतात त्या आपल्या अजुबाजूला घडत असलेल्या घटनातुन, आपण पाहत असलेल्या समस्यांतून. शहरे अक्राळ विक्राळ वाढायला लागली, टॅक्सी चालक अपुरे पडायला लागले, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडायला लागली तेव्हा या समस्येतून कोणाला तरी सुचली एक कल्पना, एक मोबाईल एप बनवायची ज्या योगे तुमच्या भागात उपलब्ध असलेल्या कॅब्स मोबाईल वरच दिसतील, गरज असेल तेव्हा त्या बोलावता पण येतील. याच कल्पनेवर चालू झालेली उबेर हि जगातील सगळ्यात जास्त व्हॅल्युएशन मिळालेली कंपनी बनली आहे.  

गरज हीच शोधाची जननी असते. गरज पडली कि माणूस विचार करायला लागतो, समस्या भेडसावायला लागल्या कि तो त्या सोडवायचा विचार करू लागतो. प्रयोग करायला लागतो, बरेचदा प्रयोग फसतात पण नवीन कल्पना यशस्वी करायला अपयश पाहावच लागते.  गूगल आणि फेसबुक पण या अपयशाचा सामना करण्या पासून चुकले नाहीत. प्रायोगिक तत्वावर चालू केलेले गूगल लॅब्स, गूगल विडिओ, गूगल आंसर्स, गूगल वेव्ह असे किती तरी प्रयोग फसले तरी गूगल प्रयोग करतच राहते तिथे तुमची आमची काय कथा ?   एखादी समस्या जेव्हा आपण पाहतो तेव्हा तीच समस्या अजून कोणाला पण भेडसावते आहे का याची चौकशी चालू होते. समस्ये मधून संपत्ती निर्माण करायचे नावचं तर स्टार्टअप आहे. 

अशाच एका माणसाच्या समस्येतुन निर्माण झाली ती आजची एक खूप मोठी जागतिक व्हिडियो स्ट्रीमिंग कंपनी. एकदारीड हेस्टिंग्ज नावाच्या एका इसमाने अमेरिकेत कोणती तरी एक डीव्हीडी ब्लॉकबस्टर नावाच्या दुकानात जाऊन भाड्याने घेतली. ती परत करण्यास त्याला उशीर झाला. नियमाप्रमाणे त्याला अतिरिक्त शुल्क भरावे लागले. खरं तर हा विलंब होण्यास अनेक कारण होती पण ते महत्वाचं नव्हतं, पहिले तर दुकानात जा, डीव्हीडी घ्या, मग ती पहा, मग ती वेळेत परत करायला परत दुकानात जा, यात ग्राहकाचा खूप वेळ जात असे. 

रीड हेस्टिंग्जला त्यातून एक कल्पना सुचली. डीव्हीडी घरपोच देण्याची. चित्रपटांचे माहिती इंटरनेट द्वारे मिळवण्याची. हि नुसती कल्पना नव्हती तर त्याने लगेच या कल्पनेवर काम चालू केलं, आपल्या भागीदारांशी बोलणी चालू केली, ती कल्पना त्यांनी जोपासली, मोठी केली आणि त्यातून उभी राहिली ती आज भारताच्या विडिओ स्ट्रीमिंग मध्ये धुमाकूळ घालणारी नेटफ्लिक्स. जगभरात बघितल्या जाणाऱ्या व्हिडीओपैकी सरासरी ८% व्हिडीओ हे एकट्या नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्म वर बघितले जातात.

कल्पना सुचणे हि काही एका दिवसाची प्रक्रिया नाही त्याच्या मागे असते ती दीर्घ तपस्या. कल्पना सुचल्यावर त्याचा अभ्यास करायला लागतो, ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करावा लागतो, कच्चा मालाचे पुरवठादार शोधावे लागतात. अनेकांच्या गळ्यात तुमच्या तंत्रज्ञांची कल्पना अक्षरशः उतरवावी लागते. त्यासाठी संवाद हे फार प्रभावी माध्यम असते पण मराठी माणूस भिडस्त असतो आणि म्हणूनच फार मराठी माणसांची नावं स्टार्टअप सोबत जोडलेली दिसत नाहीत.  

मी एक गोष्ट मराठी माणसांमध्ये पहिली आहे कि आपण आपल्या कल्पना लोकांशी बोलायला घाबरतो. याची दोन कारणं असतात – एक म्हणजे आपण टीकेला घाबरतो आणि  दुसर म्हणजे आपली कल्पना कोणी तरी चोरेल अशी भीती असते. पण कल्पनेतून स्टार्टअप कडे वाटचाल करत असताना टीकाकार अनन्य साधारण भूमिका बजावतात. आपल्या देशात स्टार्टअप चालू होऊन ते काही दिवसात गाशा गुंडाळायचं प्रमाण प्रचंड आहे म्हणून आपल्याला टीकाकार भेटले तर स्टार्टअपची ते योग्यच समजावे. कल्पनाचौर्याची भीती हा मात्र एक भ्रमच असतो. आपण आपली कल्पना सांगितली कि लगेच कोणी तरी त्यावर काम चालू करून आपली कल्पना पळवेल अशी भीती असणारे अनेक युवक मी आज पहाटे. प्रत्यक्षात वास्तव काही वेगळेच असते, अनेक जण ज्यांच्याशी आपण आपल्या कल्पना बोलतो त्यातले खूप जण आळशी असतात , काही खूप व्यस्त असतात तर काही जण आपल्या कल्पनेवर आपल्या इतके प्रभावितच झाले नसतात. कल्पना बोलत गेल्याने त्या परिपक्व होतात आणि स्टार्टअप क्षेत्रात असं म्हणतात कि त्या बोलत गेल्याने तुम्हाला गुंतवणूकदार देखील मिळायची शक्यता वाढते.     

आज आपल्या देशात इतके प्रश्न आहेत कि त्या प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर शोधल तर हजारो नवीन कल्पना मिळतील पण ती कल्पना जोपासावी लागते, त्या कल्पनेचं स्वप्नात रूपांतर व्हावं लागत आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कष्ट करावे लागतात. आज कल्पना विलासात रमणारे अनेक विद्यार्थी दिसतात त्यांना मला सांगावेसे वाटते कि निव्वळ कल्पना करणे हा वेळेचा अपव्यय आहे, मित्रांनो कल्पना असतील तर जागे व्हा, प्रयत करायला लागा आणि ध्येय पूर्ती झाल्या शिवाय थांबू नका.