स्टार्टअप म्हणजे काय रे भाऊ ?

1391

सध्या स्टार्टअप या शब्दाने व्यवसाय क्षेत्रात नुसता धुमाकूळ घातला आहे, सगळ्या वर्तमानपत्रात, इंटरनेट साईट्सवर कोणी किती पैसे गुंतवणूकदार कडून उभे केले, कोणत्या स्टार्टअपच व्हॅल्युएशन किती झाल याची तर सध्या स्पर्धाच चालू आहे. कोणी स्टार्टअप विकली ? कोणी घेतली ? का विकली ? का घेतली ? यावर चर्चांचा महापूर आला आहे. रिटेल क्षेत्रात तर स्टार्टअप या शब्दाला अनन्य साधारण महत्व आला आहे आणि आता तर वॉलमार्टने फ्लिपकार्टला विकत घेण्याची तयारी दर्शविल्यामुळे रिटेल क्षेत्रात नुसता उत्साहाचा वातावरण आहे. भारत सरकार पण सध्या स्टार्टअप या संकल्पनेला खत पाणी घालत आहे, आजूबाजूच्या सगळ्या लोकांना स्टार्टअप या विषयवार बोलताना पाहून मला खरंच प्रश्न पडतो कि स्टार्टअप म्हणजे नक्की आहे तरी काय ?

स्टार्टअप हा व्यवसायाचा असा प्रकार असतो जो कोणता तरी अस्तित्वात असलेला महत्वाचा प्रश्न सोडवत असतो, त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घेत असतो, व्यवसाय चालेल किंवा नाही याची कोणतीही शाश्वती व्यवसाय करणाऱ्याला नसते. स्टार्टअप मध्ये काम करणाऱ्यांसाठी हा मटका असतो, लागला तर कोट्यवधींचा. अनिश्चिततेलाच स्टार्टअप असे नाव असते.
सध्या जनमानसात एक समज रूढ होत चालला आहे तो म्हणजे इंटरनेटद्वारे काहीहि चालू केला कि त्याला स्टार्टअप म्हणतात. फ्लिपकार्ट, मिंत्रा, जबॉंग , बिगबास्केटमुळे इंटरनेट वरून करायच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले खरे पण  स्टार्टअप म्हणजे निव्वळ इंटरनेट नव्हे, कोणताही व्यवसाय जो समाजाचे महत्वाचे प्रश्न सोडवू शकतो त्याला स्टार्टअप म्हणू शकतात त्याला स्टार्टअप म्हणतात. शहरीकरणाच्या रेट्यात पेट्रोल पंपावर पण गर्दी होऊ लागली आहे, मग जर कोणी घरपोच पेट्रोल देण्याचा व्यवसाय चालू केला तरी त्याला स्टार्टअप म्हंटलं जाऊ शकेल.
जेव्हा फ्लिपकार्टने व्यवसाय चालू केला तेव्हा ते फक्त दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह करून विकत होते, दुर्मिळ पुस्तक वाचायला मिळवणं हा तेव्हा एक प्रश्न होता. शहरीकरणाच्या रेट्यात जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढायला लागली, काही ठिकाणी दर्जेदार माल मिळायचा तर काही ठिकाणी स्वस्त, काही गोष्टींसाठी बार्गेन कराव लागत असे, काही वस्तू राज्याच्या ठराविक भागातच उपलब्ध असायच्या तर काहींचं गंधही ग्रामीण ग्राहकाला नव्हता, कमी किमतीत हवा असलेला आणि दर्जेदार माल मिळवताना ग्राहकाची पुरती तारांबळ उडत असे.  सचिन आणि बींनी बंसलांच्या मारवाडी नजरेने हा प्रश्न अचूक हेरला आणि फ्लिपकार्टने मोठ्या खुबीने लोकांना स्वतःच्या पदरचे पैसे टाकून, जास्तीत जास्त डिस्काउंट देऊन, इंटरनेट्वरुन जीवनावश्यक वस्तू रास्त दरात खरेदी करायची सवय लावली आणि इथून खरी सुरवात झाली स्टार्टअप हि संज्ञा प्रसिद्ध व्हायला.
स्टार्टअप या संज्ञेबद्दल अनेक गैरसमज रूढ होऊ लागले आहेत, कोणत्याही नवीन व्यवसायाला आज काल मंडळी स्टार्टअप म्हणतात, एखाद्या नवीन हॉटेलला किंवा तोट्यात चालू असलेल्या फ्रॅन्चायझीला पण लोक स्टार्टअप म्हणतात पण स्टार्टअप म्हणवून घेण्यासाठी त्या व्यवसायात जगव्यापी विस्ताराची क्षमता लागते, त्यावर कोणतीही भौगोलिक मर्यादा असून चालत नाही. थोडक्यात काय – स्टार्टअप या संज्ञेची कोणतीही ठराविक व्याख्या जरी नसली तरी समाजाचे, शहरीकरणाचे प्रश्न सोडवू शकणाऱ्या, अनिश्चित वातावरणात वाढणार्या आणि झटकन विस्तार करू शकणाऱ्या कोणत्याही कंपनीला स्टार्टअप म्हणता येऊ शकत.