५ मिनिट रुल आणि एलॉन मस्क

468

सध्याचे सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मस्क आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेळेच्या नियोजनासाठी ‘टाईम ब्लॉकिंग’ची (वेळ राखून ठेवण्याची) पद्धत वापरतात. त्यांच्या व्यतिरिक्त जगातील अनेक यशस्वी उद्योगपती (बिल गेट्स, कॅल न्यूपोर्ट, इ.) हा नियम पाळतात. ह्या व्यक्तींच्या यशामध्ये ‘टाईम ब्लॉकिंग’ पद्धतीचा नक्कीच मोठा वाटा आहे.

एलॉन मस्क हे नाव खूप जणांना माहिती असेल. सध्याचा काळातील ते एक सर्वात हुशार आणि व्यस्त उद्योगपती आहेत. सामान्य माणसाला मंगळ ग्रहावर पाठविण्याचे त्यांचे स्वप्न आहे आणि त्यासाठी ते अहोरात्र मेहनत करीत आहेत.

इलेक्ट्रिक कार क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टेस्ला तसेच अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील खासगी कंपनी स्पेसएक्स ह्या दोन मोठ्या कंपन्यांचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. स्वतः स्थापन केलेल्या ह्या कंपन्यांमध्ये ते तंत्रज्ञ म्हणून काम पाहतात आणि अनेकदा टेस्ला किंवा स्पेसएक्सच्या उत्पादनांसाठी कोड पण लिहतात.

दररोज ११ ते १४ तास काम करणारे एलॉन मस्क फक्त ६ तास झोपतात. त्यांना मूल पण आहेत. आपल्या कुटुंबासाठी पण ते कायम वेळ राखून ठेवतात. ह्या व्यतिरिक्त ते आठवड्यातील काही दिवस व्यायाम करतात. आपल्या छंदांसाठी वेळ देतात तो वेगळाच!

एलॉन मस्क ह्यांच्या यशाचे गुपित आहे ‘५ मिनिट रूल’. 

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पूर्ण दिवसाचे मस्क ह्यांनी आदल्या दिवशीच नियोजन करून ठेवलेले असते. ५ मिनिटाचा एक ब्लॉक (भाग) असे पूर्ण दिवसाचे ते ५ – ५ मिनिटांच्या ब्लॉक्स (भाग) मध्ये विभाजन करतात. कुठला ५ मिनिटाचा ब्लॉक कुठल्या कामासाठी वापरायचा हे आधीच ठरलेले असते. म्हणजे बघा एका ५ मिनिटांच्या ब्लॉक मध्ये ते ई-मेलना  प्रत्युत्तर देतात, दुसऱ्या ब्लॉक मध्ये जेवण आटोपून घेतात. किंबहुना व्यवसायासंबंधित मिटींग्स पण कमी वेळामध्ये आटोपून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसेच काम सुरु असताना मधेच समजा फोन आला तरी तो उचलण्याचा ते टाळतात.

एलॉन मस्क ह्यांचा ‘५ मिनिट रूल’ वरकरणी खूप साधा वाटत असला तरी त्याची अमलबजावणी करणे खूपच कठीण आहे. ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला जी कामे करायची आहेत त्याचे आदल्या दिवशीच तुम्हाला नियोजन करावे लागते ते पण ५ – ५ मिनिटांच्या ब्लॉक्स मध्ये बसवून.

वेळ नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ पण टाईम ब्लॉकिंग तंत्राचे खूप फायदे असल्याचे सांगतात. 

एखादी गोष्ट करण्यासाठी तुमच्या हातात खूप कमी वेळ असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमची पूर्ण शक्ती पणाला लावता. थोडक्यात तुमची उत्पादनक्षमता वाढते आणि ते काम पूर्ण होण्याची शक्यता वाढते. तसेच कोणते काम कधी करायचे हे आधीच ठरविलेले असल्यामुळे तुमचे मन हातात असणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतले जाते आणि इतर गोष्टींविषयी विचार मनात येणे बंद होते. थोडक्यात तुमची एकाग्रता वाढते.

एलॉन मस्क ह्यांचा ‘५ मिनिट रूल’ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आणला जाऊ शकतो. त्यासाठी काही पायऱ्या आहेत.

  1. एक कागद घ्या. त्यावर दिवसामध्ये कोणकोणती कामे करायची आहेत त्याची नोंद करा.
  2. आता हि कामे पूर्ण करण्यासाठी अंदाजे किती वेळ लागेल ते त्याच्या समोर लिहा.
  3. आता प्रत्येक कामासाठी लागणाऱ्या वेळेचे ५ – ५ मिनिटांच्या ब्लॉक्स मध्ये विभाजन करा. समजा एका कामाला एक तास लागत असेल तर ५ मिनिटांचे १२ ब्लॉक्स राखून ठेवा.
  4. मोठ्या कामांसाठी वाढीव वेळ राखून ठेवा जेणेकरून ते पूर्ण झाले नाही किंवामध्येच काही दुसरे छोटे काम आले तर त्यासाठी थोडा वेळ देता येईल.

स्टार्टअप्स मध्ये काम करणाऱ्या किंवा एका माणसावर निर्भर असणाऱ्या व्यवसायात हा ५ मिनिट रुल खूप महत्वाचा ठरतो.