भाऊबंदकीतून निर्माण झालेल्या जगातील शूज कंपन्या

109

कॉर्पोरेट जगतात भावा भावांची भांडण हि केवळ बिर्ला, अंबानी आणि बजाज यांच्यातच होतात अस नाही तर जग भरतील कोर्पोरेट विश्वात ती होत असतात. अशाच दोन जर्मन भावांच्या भांडणातून निर्माण झाल्या त्या प्युमा आणि आदिदास या शूज कंपन्या.

रुडॉल्फ डॅसलर हा डॅसलर भावंडातला मोठा भाऊ होता, हा खरं तर पोलीस बनायला चाललेला तर अ‍ॅडॉल्फ डॅसलर हा लहान भाऊ आणि स्वतः एक ऍथलिट होता. ऍथलेट्ससाठी कोणतेही वेगळ्या प्रकारचे जोडे बनवले जात नाहीत हे त्याच्या चाणाक्ष नजरेने हेरले होते.

१९२४ साली जर्मनीतील हर्झोजेनौराच शहरात अ‍ॅडॉल्फ आणि रुडॉल्फ ह्या दोन भावांनी ‘डॅसलर ब्रदर्स स्पोर्ट्स शूज कंपनीची’ स्थापना केली. एका छोट्याश्या खोलीत त्यांनी हि कंपनी सुरु केली होती. मोठा भाऊ रुडॉल्फ हा बोलण्यामध्ये तरबेज असल्यामुळे विक्री आणि विपणनाची जबाबदारी उचलायचा तर छोटा भाऊ अ‍ॅडॉल्फ हा डिजायनर असल्यामुळे बुटांच्या डिजाईन बनविण्याकडे लक्ष द्यायचा.

ऍथलेट्सना जर योग्य प्रकारचे बूट बनवून दिले तर ते स्पर्धा जिंकू शकतील असा आत्मविश्वास एडॉल्फ डॅसलरला होता. १९२८ साली हॉलंड मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने लीना राडके या स्पर्धकाला दिल्या आणि ती ८०० मीटरची स्पर्धा जिंकलीच नाही तर तिने नवीन विक्रम देखील नोंदवला.  नंतर १९३२ सालच्या ऑलिम्पिक मध्ये अमेरिकेत अनेक खेळाडू त्यांचे शूज घालून सहभागी झाले. १९३३ साली हिटलरची पार्टी जर्मनीत निवडून आली आणि डॅसलर भावंडांना जबरदस्तीने का असेना पण या पार्टीचे सभासद बनवण्यात आले.

१९३६ सालापर्यंत धंदा बेताचाच चालला होता. पण काही दिवसांच्या काळामध्ये दोन्ही भावांचे नशीबदोन्ही  पालटले. त्यावर्षी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन जर्मनीमध्ये करण्यात आले होते. त्या वर्षी या भावंडांना सुप्रसिध्द आफ्रिकन-अमेरिकन धावपटू जेसी ओवेन्स ह्याचे बूट डिजाईन करण्याची संधी मिळाली.

आणि योगायोग असा कि ओवेन्सने ते बूट वापरून त्या स्पर्धेमध्ये ४ सुवर्णपदके मिळविली. ओघाओघानेच त्याने वापरलेल्या बुटांना आणि बूट कंपनीला प्रसिद्धी मिळू लागली.

डॅसलर शूज कंपनीच्या विक्रीचा आलेख वरवर जाऊ लागला. १९३८ साली त्यांनी कंपनीचा दुसरा कारखाना चालू केला. पण त्यानंतर त्यांच्या व्यवसायाला एक मोठा झटका बसला तो दुसऱ्या महायुद्धामुळे. दोघांनाही सरकारने सेनादलात रुजू होण्याचे आदेश दिले. एडॉल्फ एयरफोर्स मध्ये रुजू झाला पण लगेच त्याला तिथून सोडण्यात पण आले आणि जर्मन सरकारने त्याला सेनादलासाठी बूट बनवायचे फर्मान सोडले.

१९४३ सालात जेव्हा रूडॉल्फला जर्मन सैन्याने पाचारण केले तेव्हा रूडॉल्फही इच्छा होती कि त्याच्या जागी त्याच्या बायकोला कंपनीचा कारभार पाहू द्यावा पण कंपनीच्या करारनाम्यात असे स्पष्ट लिहलेलं कि अशा कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत दुसऱ्या भावाने व्यवहार पाहावेत. इथून दोन्ही भावात पहिली ठिणगी पडली, आणि नंतर त्यांच्यातले मतभेद वाढतच गेले. १९४८ साली घरगुती भांडणाने उग्र रूप धारण केले आणि कंपनी फुटली.

अ‍ॅडॉल्फने आपल्या नवीन कंपनीला अ‍ॅडिडास असे नाव दिले तर रुडॉल्फने सुरुवातीला त्याच्या कंपनीला रुडा असे नाव दिले जे पुढे काही काळाने बदलून प्युमा असे करण्यात आले. दोन्ही कंपन्यांमधील चढाओढीला पण खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. एडॉल्फ हा राष्ट्रीय फुटबॉल संघाचा पाठीराखा आणि अधिकृत प्रायोजक बनला आणि प्युमाला पहिली ठेच बसली.

१९५४ सालचा फुटबॉल विश्वचषक आदिदासच्या बुटांमुळे जर्मनी जिंकली असं उघडपणे बोललं जाऊ लागलं.

दोन्ही कंपन्यांतील स्पर्धा पुढे कित्येक वर्षे तशीच राहिली. दोन्ही भाऊ भविष्यात कधीच एकमेकांशी बोलले नाहीत. एवढेच नव्हे तर हर्झोजेनौराच ह्या शहरावर पण त्यांच्या भांडणाचे पडसाद उमटले. शहरातील नदीच्या दोन विरुद्ध टोकांना दोन्ही कंपन्याचे तळ उभारण्यात आले. १९७० सालच्या विश्वचषकात फायनल मॅचच्या नाणेफेकी नंतर ब्राझील कर्णधार पेले याने रेफ्रीला विनंती करवून बुटाच्या नाड्या बांधायला वेळ मागितली आणि सर्व कॅमेरे त्यावेळेस पेलेच्या बुटांकडे वळवले गेले प्युमाची अशक्यप्राय जाहिरात पेलेनी केली. १९७४ साली रुडॉल्फ आणि १९७८ साली एडॉल्फ यांच्या निधनानंतर देखील कित्येक वर्षे दोन्ही कंपन्यांतील चढाओढ तशीच टिकून राहिली. २००९ मध्ये एका प्रदर्शनीय फुटबॉल सामन्याच्या निमित्ताने दोन्ही कंपन्या त्यांचा भूतकाळ विसरून समोरासमोर आल्या आणि खेळातील बुटांच्या क्षेत्रात नाव कमावलेल्या दोन मोठ्या कंपन्यांतील तणाव अशा प्रकारे खेळाच्या मैदानातच निवळला.