बालाजी वेफर्सची यशोगाथा मोजक्या शब्दात

  105

  पोपटभाई विराणी आपल्या कुटुंबासह शेतीवर गुजराण करत होते. १९७२ साली गुजराथ मध्ये भयंकर दुष्काळ पडला. पावसाचा एक थेंबहि नजरेस पडत नव्हता. शेती करणं अवघड झालं होतं म्हणून पोपटभाईंनी आपली पिढीजात जमीन विकून २० हजार रुपये मेघजीभाई, भिकुभाई, चंदूभाई या आपल्या ३ मुलांना व्यवसाय करण्यासाठी दिले.त्यांचा चौथा भाऊ कानूभाई हा आपल्या बहिणींसोबत गावातच राहिला.

  ही मुले राजकोटला आली. शेतीची पार्श्वभूमी असल्याने शेतीशी संबंधित काहीतरी व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी खते आणि कृषीविषयक साधने खरेदी केली. पण विकायला गेले तेव्हा कळले कि ही खते बनावट आहेत. विराणी बंधूंसाठी हा फार मोठा धक्का होता. वडलांनी वडिलोपार्जित जमीन विकून व्यवसायासाठी पैसा दिला होता. फसवणुकीमुळे पैसापण गेला होता.

  आता पुढे काय करायचं ? हा यक्षप्रश्न होता. विराणी बंधूंनी एक कॉलेज कॅन्टीन चालवायचं ठरवलं. यावेळी चंदुभाई अवघा १७ वर्षांचा होता. ज्यावेळेस कॉलेज मध्ये पहिलं पाऊल ठेवायचं वय असतं त्यावेळी हा किशोरवयीन मुलगा कॅन्टीनमध्ये काम करायचा. मात्र लवकरच हे कॅन्टीनसुद्धा बंद पडलं.

  १९७४ मध्ये विराणी बंधू राजकोटमधील ऍस्टन सिनेमागृहाच्या कॅन्टीनमध्ये नोकरीस लागले. कॅन्टीनमध्ये काम करता करता ही मुले तिकीट खिडकीवर तिकीटे देखील विकायची. कधी कधी डोअरकीपरचे काम देखील करायची. त्यांच्या या कष्टाळू स्वभावाने सिनेमागृहाचे मालक गोविंदभाई खूष झाले. १९७६ मध्ये त्यांनी विराणी बंधूना कंत्राटी पद्धतीवर कॅन्टीन चालविण्यास दिले. सुरुवातीला ते वेफर्स स्थानिक विक्रेत्याकडून खरेदी करत आणि विकत, मात्र यामध्ये काहीच पैसे सुटत नव्हते. नवऱ्याला व्यवसायात मदत करण्यासाठी त्यांच्या बायका देखील आल्या. त्या टोस्टेड सॅण्डविच तयार करायच्या. १९८२ साली त्यांनी एक तवा घेतला आणि बटाटा वेफर्स तयार करुन विकू लागले. हा चंदूभाई विराणी आणि त्यांच्या बंधूच्या आयुष्यातील सर्वांत महत्वाचा टप्पा ठरला.

  बटाट्याच्या वेफर्स मध्ये फायदा आहे हे त्यांच्या ध्यानी आले. फक्त कॅन्टीनपुरतं मर्यादित न राहता आता हे वेफर्स दुकानांत देखील विकण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी या वेफर्सला ‘बालाजी’ हे नाव दिलं. .

  मागणी वाढत असल्याने त्यांनी वेफर्स तयार करणारी यंत्रे आणि तंत्र खरेदी केले. १९८२-१९८९ दरम्यान व्यवसाय वाढला, मात्र नफा तसाच वेफर्सप्रमाणे बारीक राहिला. व्यवसायाला खरी बरकत आली ती १९९२ नंतर जेव्हा कंपनी प्राईव्हेट लिमिटेड झाली. या प्राईव्हेट कंपनीचे कानूभाई, चंदू भाई आणि भिकुभाई संचालक होते. आज या तीन भावांची पुढची पिढी देखील याच व्यवसायात आहे.

   त्यांनी प्रति तासाला १००० किलो वेफर्स तयार करणारे ५० लाख रुपयांचे स्वयंचलित यंत्र खरेदी केले, मात्र वारंवार हे यंत्र बिघडायचे. अनेक महिने काहीही उत्पादन न करता हे यंत्र तसेच पडून राहिले. मात्र हार न मानता त्यांनी प्रयत्न चालूच ठेवले. शेवटी ते यंत्र नीट करण्यात त्यांना यश आले. २००३ मध्ये १२०० किलो प्रति तास वेफर्स तयार करणारे यंत्र त्यांनी बसविले. मात्र पूर्वाश्रमीचा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याने यावेळी अपयश त्यांना पहावे लागले नाही. २००० ते २००६ दरम्यान गुजरात मधील ९० टक्के वेफर्सची बाजारपेठ बालाजीने काबीज केली. आज बालाजी दरदिवशी साडेचार लाख किलो बटाट्याच्या वेफर्सची, तर ४ लाख किलो नमकीनची निर्मिती करते.

  दररोज तब्बल ३ लाख वेफर्सच्या पाकिटांची निर्मिती केली जाते. २०१३ मध्ये जगात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या पेप्सी कंपनीने त्यांना खरेदी करायची तयारी देखील केली होती पण पुढे हा व्यवहार काही होऊ शकला नाही आणि त्यांनी स्वतःच्याच कंपनीचा आयपीओ काढायची तयारी मात्र चालू केली.

  एका तव्यानिशी सुरु झालेला बालाजीचा हा व्यवसाय वलसाडच्या ३५ एकर जागेत स्थिरावलाय. सुरुवातीला ३ कामगार होते, तर आज प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या अडीच लाख लोकांना बालाजी रोजगार देत आहे. एवढंच नव्हे तर बालाजीचा हा व्याप अमेरिका, लंडन आणि युरोपात देखील विस्तारला आहे. परदेशात बालाजीचे ६०० च्या वर वितरक आहेत. तब्बल ४० हून अधिक देशात बालाजी वेफर्स विकले जातात.सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे कि आयटीसी किंवा पेप्सी प्रमाणे बालाजी वेफर्सची टीव्ही वर जाहिरात फार कमी वेळा दिसते पण विक्रीसाठी त्यांनी बनवलेल विक्रेत्यांच जाळं हि त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब ठरते.

  बालाजी कंपनीची वाटचाल हा एक अभ्यासच आहे. त्यामुळेच दररोज शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी बालाजीला भेट देत असतात. चंदुभाई स्वत: या मुलांसोबत संवाद साधतात. त्यांच्या शंकांचं निरसन करतात.निव्वळ ९ वी पर्यंत शिक्षण झालेले चंदुभाई, १२०० कोटीच्या वर उलाढाल असलेला बालाजी उद्योगसमूह सांभाळत आहेत. दुष्काळाला न डगमगणारे चंदुलालचे वडिल पोपटलाल आणि वारंवार अपयश येऊन देखील न डगमगता व्यवसाय करणारे चंदुलालचे अन्य बंधू यांच्यामुळेच आज ‘बालाजी’ने वेफर्सच्या जगात अढळ स्थान मिळविले आहे.